अकरावीची चौथी यादी जाहीर
By Admin | Published: July 19, 2016 04:11 AM2016-07-19T04:11:16+5:302016-07-19T04:11:16+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली.
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात आली. या यादीत १ हजार २२८ नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून, अजूनही केवळ दोन विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, बेटरमेंटसह एकूण १५ हजार ५२४ विद्यार्थ्यांना चौथ्या यादीत महाविद्यालय मिळाले असून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा कट आॅफही बराच घसरल्याचे दिसले.
तिसऱ्या यादीपर्यंत ९० टक्क्यांपलीकडे स्थिरावलेला कट आॅफ चौथ्या यादीत मात्र ९० टक्क्यांखाली उतरला. मात्र काही नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश हाऊसफुल्ल झाल्यानेच कट आॅफचा टक्का घसरल्याची माहिती आहे. चौथ्या गुणवत्ता यादीमध्ये एकूण १४ हजार २८३ विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळाली. महत्त्वाची बाब म्हणजे या यादीमध्ये एकूण ५ हजार ९४१ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. तर २ हजार ९६१ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि १ हजार ८२९ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश घेतलेल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन आॅनलाइन प्रवेश रद्द करायचा आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, पहिला प्रवेश रद्द केल्यानंतरच पुन्हा प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन तो निश्चित करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थ्यांना १९ व २० जुलैदरम्यानचा कालावधी उपलब्ध आहे. तरी कोणत्याही विद्यार्थ्याने आॅफलाइन प्रवेश घेऊ नये, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, याची शाश्वतीही उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, चौथ्या यादीनंतरही केवळ दोन विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नसून, त्यांच्यासाठी लवकरच समुपदेशन फेरीची व्यवस्था करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय आॅनलाइन
प्रवेश प्रक्रियेबाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नोंदणीची संधी देण्याचा विचार उपसंचालक कार्यालयातून सुरू असल्याचे कळाले. (प्रतिनिधी)