चौथा नेपाळी आरोपी अटकेत
By Admin | Published: January 17, 2017 06:07 AM2017-01-17T06:07:20+5:302017-01-17T06:07:20+5:30
मणप्पूरम गोल्ड लोन फायनान्सच्या उल्हासनगर शाखेतून जवळपास सात कोटी रुपयांचे सोने चोरणाऱ्या टोळीतील चौथ्या नेपाळी आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली.
राजू ओढे,
ठाणे- मणप्पूरम गोल्ड लोन फायनान्सच्या उल्हासनगर शाखेतून जवळपास सात कोटी रुपयांचे सोने चोरणाऱ्या टोळीतील चौथ्या नेपाळी आरोपीस ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याच्या चौकशीतून टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
२६ डिसेंबर २०१६ रोजी मणप्पूरम गोल्ड फायनान्सच्या उल्हासनगर शाखेच्या भिंतीला भगदाड पाडून सात कोटी २२ लाखांचे सोने एका टोळीने लंपास केले होते. ४ जानेवारी रोजी पोलिसांनी याप्रकरणी कमरुद्दीन असुद्दीन शेख आणि मनोज नुरबहादूर सुद यांना अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुस्तफा ऊर्फ अख्तर शमशेर शेख याला नवी मुंबईतील तुर्भे येथून अटक केली. या आरोपींच्या चौकशीतून आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. त्यानुसार, नेपाळचा रहिवासी खडकसिंग याला ठाण्याच्या गुन्हे शाखा-घटक १ च्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. गुन्हे शाखेने या आरोपीस तपास अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.
खडकसिंगने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. खडकसिंगने या गुन्ह्यात वाहनचालकाचे काम केले होते. चोरलेल्या सोन्यामध्ये त्यालाही वाटा मिळाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या टोळीत आणखी काही आरोपी असून अटक आरोपींच्या चौकशीतून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणा करीत आहे. (प्रतिनिधी)
>सोने जप्तीचे आव्हान : मणप्पूरमच्या उल्हासनगर शाखेतून तब्बल ७ कोटी २२ लाख रुपये किमतीचे जवळपास २८ किलो सोने चोरी गेले होते. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असली तरी त्यांच्याकडून केवळ ३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. आता उर्वरित आरोपींच्या अटकेसोबतच चोरीचे सोने जप्त करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.