दोडामार्गमध्ये ‘स्वाइन’चा चौथा रुग्ण
By admin | Published: May 10, 2017 11:03 PM2017-05-10T23:03:50+5:302017-05-10T23:03:50+5:30
आरोग्य यंत्रणेत खळबळ; माकडतापापाठोपाठ स्वाइनचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
दोडामार्ग : माकडतापापाठोपाठ स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. तालुक्यात स्वाइन फ्लू बाधित चौथा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. गितांजली गोविंद सावंत (वय ५७, रा. झरेबांबर) असे रुग्णाचे नाव असून, त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.
गेल्या वर्षभरात माकडतापाने दोडामार्ग आणि बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच काहीजणांचे बळीही गेले. त्यामुळे दोडामार्ग व बांदा परिसरातील लोक माकडतापाच्या दहशतीखाली आहेत. असे असताना महिनाभरापूर्वी तालुक्यात सोनावल येथे रंजना अशोक चोर्लेकर (४२), घोडगेवाडी येथे प्रथमेश प्रभाकर सातार्डेकर (१०) व साटेली-भेडशी येथील विराज गवस असे तीन रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून स्वाईन फ्लूवरील औषधे उपलब्ध असल्याने ताप आल्यास सरकारी दवाखान्यात येऊन तपासून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले होते.
अशातच झरेबांबर येथील गितांजली गोविंद सावंत यांना ताप येत असल्याने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार करून त्यांची तब्येत सुधारल्यावर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली.
महिन्याभरात चार रुग्ण
स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, गेल्या महिन्याभरात चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, नागरिकांनी ताप आला म्हणून घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य यंत्रणेच्यावतीने डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले आहे.