चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 06:22 AM2024-05-13T06:22:16+5:302024-05-13T06:24:13+5:30
राज्यात ११ मतदारसंघांमध्ये आज होणार मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चौथ्या टप्प्याच्या प्रचारात उडालेला आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा खाली बसल्यानंतर उद्या सोमवारी राज्यातील ११ मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात मुलगा, सून, बहीण यांना निवडून आणण्यासाठी बाप, सासरे आणि भाऊ अशा नात्यांची कसोटी असून या निमित्ताने राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, डॉ.विजयकुमार गावित हे विद्यमान मंत्री आणि के.सी. पाडवी आणि एकनाथ खडसे हे माजी मंत्री या दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदासंघांमध्ये उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. मतदारांना उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये, म्हणून निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या आहेत.
या लढतींकडे असेल लक्ष
- अहमदनगर : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण शक्ती मुलगा सुजयच्या मागे उभी केली आहे, तर या निमित्ताने नगर जिल्ह्यातील विखे विरोधक एकत्र आले आहेत. त्यांना शरद पवार गटाच्या नीलेश लंके यांचे आव्हान आहे.
- बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे बंधू कृषिमंत्री धनंजय मुंडे ताकदीनिशी उतरले आहेत. पंकजा यांना शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचे आव्हान आहे.
- औरंगाबाद : शिंदेसेनेचे संदीपान भुमरे, उद्धवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत.
- शिरुर : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील लढाईकडे ‘शिवाजी विरुद्ध संभाजी’ म्हणून पाहिले जाते.
- नंदुरबार : विद्यमान मंत्र्याची मुलगी विरुद्ध माजी मंत्र्याचा मुलगा असा सामना. डॉ.हिना गावित विजयाची हॅटट्रिक साधतील का, याची उत्सुकता.
- जळगाव : उद्धवसेनेचे करण पवार व भाजपच्या स्मिता वाघ यांच्यात लढत. करण पवार यांना भाजपचे मावळते खासदार उन्मेष पाटील यांचे पाठबळ असल्याने ही भाजप विरुद्ध भाजप लढत मानली जाते.
- रावेर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात सरळ सामना.
- जालना : विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे रावसाहेब दानवे यांना काँग्रेसचे कल्याण काळे यांचे आव्हान.