चौथी आत्महत्या
By admin | Published: June 9, 2017 12:54 AM2017-06-09T00:54:55+5:302017-06-09T00:54:55+5:30
बारामती तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सलग चौथ्या आत्महत्येने बारामती तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुपे : बारामती तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सलग चौथ्या आत्महत्येने बारामती तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. भोंडवेवाडी येथील हनुमंत पांडुरंग शिंदे (वय ४८) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आली. महिन्यापासून तालुक्यातील ही चौथी घटना आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, कर्जबाजारीपणामुळे शिंदे यांनी आत्महत्या केली असल्याची खबर त्याचा भाऊ सुनील शिंदे यांनी पोलिसांना दिली. शेतात दोन वर्षांपासून काही पिकत नव्हते. त्यामुळे भोंडवेवाडी सोसायटीचे तसेच छत्रपती शिवाजी राजे पुरुष गटाचे कर्ज झाले होते. पुरुष गटाचे कर्ज वेळेवर भरता आले नसल्याने थकले होते. दुसऱ्या मुलीच्या लग्नाची बोलणी झालेली होती. तर आईचे सतत असणारे आजारपण, मागील दोन महिन्यांपूर्वी सोसायटीच्या पीक कर्जातून आणलेली बैलजोडी सर्पदंशाने मृत पावली. या सर्व घटनांतून आलेल्या नैराश्यातून हनुमंत यांनी दुसऱ्याच्या शेतात जाऊन मध्यरात्रीला विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती त्यांचा भाऊ सुनीलने पोलिसांना दिली.
यासंदर्भातील अधिक तपास येथील पोलीस उपनिरिक्षक ए. एस. जाधव करीत आहेत. बारामती तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची गेल्या एक महिन्यातील ही चौथी घटना आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. एका मुलीचे लग्न झालेले असून दुसऱ्या मुलीचे होणार होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समिती सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पंचायत समिती सदस्या नीता बारवकर, अप्पा शेळके, शौकत कोतवाल, गणेश चांदगुडे, पोपटराव पानसरे, संपतराव काटे आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान या घटनेची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुपे ग्रामीण रुग्णालयात
येऊन कुटुंबाची भेट घेतली.
या वेळी त्यांच्या एका मुलाची व मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी सुळे यांनी घेतली. तसेच या सरकारने लवकच शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी केली.