चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये : चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 06:39 PM2018-09-05T18:39:39+5:302018-09-05T18:40:52+5:30
महाराष्ट्र सरकार हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई : आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा, संशोधन व्हावे, यासाठी ‘फ्युचर वी वाँट – ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अँड ॲक्शन’ या संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या दरम्यान मुंबई आयआयटी येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेसाठी सुकाणू समितीची पहिली बैठक आज मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक दौलत देसाई, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम आणि अभिसरण सोसायटीचे (Disaster Management Initiative and Convergence Society) सल्लागार व माजी केंद्रीय सचिव पी. जी. धार चक्रवर्ती आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाबरोबरच भारतीय प्राद्योगिक संस्था, मुंबई (आयआयटी), डीएमआयसीएस, टाटा सामाजिक संस्था हे या परिषदेचे सह आयोजक आहेत. या जागतिक परिषदेत देशभरातील विविध राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी, आपत्ती निवारणाशी संबंधित विविध स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, संशोधक, तज्ज्ञ व्यक्ती जगभरातून उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या ठिकाणी आपत्ती निवारण विषयक प्रदर्शन सुध्दा मांडण्यात येणार आहे.
29 जानेवारी 2019 रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आपत्ती निवारणासंदर्भातील जागतिक संरचनेच्या अंमलबजावणीमधील आव्हानांवर या परिसंवादात चर्चा होणार आहे. परिषदेत विविध सत्रांमध्ये आठ विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये जागतिक पातळीवरील तज्ज्ञ व्याख्याने देणार आहेत. तसेच विविध संशोधकांना परिषदेत आपले शोध निबंध मांडता येणार असून हे शोध निबंध नंतर जागतिक पातळीवरील प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या परिषदेतील मांडण्यात येणारे शोध निबंध, संशोधन व नाविन्यपूर्ण स्टार्टअपसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. येत्या 10 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत लघुनिबंध पाठविता येतील. परिषदेत लोकप्रतिनिधी, विविध शहरांचे महापौर, आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे.
डीएमआयसीएसच्या वतीने पहिली आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस हैद्राबाद येथे 2008 मध्ये झाली. त्यानंतर दुसरी सन 2015 व तिसरी परिषद सन 2017मध्ये विशाखापट्टणम येथे झाली. तिसऱ्या जागतिक परिषदेत 56 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.