चौथे विश्व साहित्यसंमेलन अंदमानमध्ये होणार

By admin | Published: July 3, 2015 03:26 AM2015-07-03T03:26:14+5:302015-07-03T03:26:14+5:30

पहिल्या तीन विश्व मराठी साहित्यसंमेलनाने सातासमुद्रापार भरारी घेतल्यानंतर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवनांच्या स्मृती त्यांच्याच सुवर्णमयी

The fourth world literary festival will be held in Andaman | चौथे विश्व साहित्यसंमेलन अंदमानमध्ये होणार

चौथे विश्व साहित्यसंमेलन अंदमानमध्ये होणार

Next

पुणे : पहिल्या तीन विश्व मराठी साहित्यसंमेलनाने सातासमुद्रापार भरारी घेतल्यानंतर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवनांच्या स्मृती त्यांच्याच सुवर्णमयी पुण्यतिथीनिमित्त जागृत झाल्याचे भासवित भारतातच हे संमेलन घेण्यावर मराठी साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि आॅफबीट डेस्टिनेशन या संस्थेच्या वतीने हे संमेलन आॅक्टोबरमध्ये अंदमान येथे आयोजित करण्याची घोषणा महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केली.
विश्व साहित्य संमेलनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली. त्यात चौथे विश्व साहित्य संमेलन अंदमानला घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संमेलनाला निधी देण्यास शासनाने दिलेला नकार, कॅनडाचे संमेलन रद्द करण्याची ओढावलेली नामुष्की, दक्षिण आफ्रिकेकडून आलेला प्रस्ताव, आर्थिक सहकार्याशिवाय आयोजकांची संमेलन घेण्याची असमर्थता असा इतिहास असताना हे संमेलन होणार, की नाही? याबाबत साहित्य वर्तुळात उत्सुकता होती.
चौथे साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी इच्छुक असल्याचा प्रस्ताव शिवसंघ प्रतिष्ठान आणि आॅफबीट डेस्टिनेशन यांनी दिला होता. मात्र, शिवसंघ प्रतिष्ठानने निवास आणि येण्याजाण्याचा खर्च उचलण्यास नकार दिला; मात्र आॅफबीट डेस्टिनेशनने हा सर्व खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्याने त्यांच्याच कोर्टात आयोजनाचा चेंडू टाकण्यात आला.
टोरंटोच्या विश्व साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची निवड करण्यात आली होती. परंतु, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यास पत्राद्वारे त्यांनी नकार दिला. तरीही त्यांना दूरध्वनी करून अध्यक्षपद स्वीकारण्याचा आग्रह करण्यात आला. मात्र वैयक्तिक कारणास्तव नकार दिल्याने आता संमेलनाध्यक्षाची पुन्हा नव्याने निवड केली जाणार असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विश्व संमेलन घेऊ नये, या साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या पत्राला केवळ दफ्तरी दाखल करून घेत असल्याचे स्पष्टीकरण देत महामंडळाने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत.

महामंडळाची मुदत पुढच्या वर्षी संपणार
मराठी साहित्य महामंडळ पुढील वर्षी नागपूरकडे जाणार आहे. सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल ३१ मार्च २०१६ ला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या महामंडळाच्या कारकिर्दीतच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबरोबरच विश्व मराठी साहित्य संमेलन व्हावे, यासाठी प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते.

विश्व साहित्य संमेलन हे भारतात देखील होऊ शकते, अशी तरतूद घटनेमध्ये आहे. त्यानुसार अंदमानात सावरकरांच्या पुण्यतिथीला संमेलन समर्पित करण्यात येणार आहे. या संमेलनासाठी आम्ही कुणाचीही मदत घेणार नाही. मात्र जे सावरकरप्रेमी सहकार्याचा हात देतील त्यांची मदत नक्कीच स्वीकारली जाईल. - डॉ. माधवी वैद्य

Web Title: The fourth world literary festival will be held in Andaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.