गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न; छगन भुजबळांची सरकारवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:34 PM2022-11-05T16:34:21+5:302022-11-05T16:35:32+5:30
मोठ मोठे प्रकल्प गुजरातला आणि प्रदूषणाचे प्रकल्प महाराष्ट्राला हा कोणता न्याय? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.
शिर्डी - वेदांता - फॉक्सकॉन सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळवला गेला. तेव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असं म्हणणाऱ्यांनी अजुन एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. या उलट फॉक्सकॉर्न पाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअर बसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आला. आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ २ हजार कोटीचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला अशी खोचक टीका राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रातले रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात आहेत. मी स्वतः त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिले होते की तुम्हाला सर्व सुविधा देऊ महाराष्ट्रात आणि या नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन या एचएलएलच्या सोबत या एअरबसचे उत्पादन करा, त्यासाठी तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. मात्र तो प्रकल्प गुजरातला गेला. विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रोन’चा प्रकल्प देखील हैदराबादला गेला असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मोठ मोठे प्रकल्प गुजरातला आणि प्रदूषणाचे प्रकल्प महाराष्ट्राला हा कोणता न्याय? महाराष्ट्रातून डायमंड मार्केट सुरतला, कपडा मार्केट सुरतला, बेलापुरचे रासायनिक कारखाने दहेजला, आयटी हब अहमदाबादला, टाईल्स व्यवसाय वापीला, मुंबई बंदराची जहाजे वळली कच्छच्या अदानी पोर्टला, जलद गतीने अजून व्यवसाय गुजरातला नेण्यासाठी बुलेट ट्रेन ज्यांचा अधिक खर्च महाराष्ट्रावर आहे असा आरोपही भुजबळांनी केला.
निवडणुकीच्या दृष्टीने तयार राहा
फुले, शाहु, आंबेडकरांच्या राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण काही मंडळी करु पाहत आहेत. पण ते विसरतात की धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले-शाहु-आंबेडकरच आम्हाला देतात. धर्मांध पक्षाशी लढा हा विकासाच्या मुद्द्यावरूनच करावा लागेल. आपण विकासाचे राजकारण करतो पण देशात सध्या काय चालू आहे याचा विचार करत आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार रहावं लागणार आहे असं आवाहन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"