धुळवडीच्या दिवशी विकृताने महिलेच्या ओठाचा चावून पाडला तुकडा
By admin | Published: March 16, 2017 03:35 AM2017-03-16T03:35:07+5:302017-03-16T03:35:07+5:30
धुळवडीच्या दिवशी इमारतीखाली फेरफटका मारत असलेल्या ५० वर्षांच्या महिलेस अडवून एका विकृताने तिच्या ओठांचा चावा घेतला.
मुंबई : धुळवडीच्या दिवशी इमारतीखाली फेरफटका मारत असलेल्या ५० वर्षांच्या महिलेस अडवून एका विकृताने तिच्या ओठांचा चावा घेतला. यात तिच्या ओठांचा तुकडा खाली पडल्याची विचित्र घटना सायन परिसरात घडली. महिलेच्या ओठांवर हिंदुजा रुग्णालयात प्लास्टीक सर्जरी करण्यात आली असून, त्या अजूनही मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. सायन पोलिसांसह गुन्हे शाखा या विकृत तरुणाचा शोध घेत आहे.
सायन परिसरात तक्रारदार महिला गेल्या दोन महिन्यांपासून कुटुंबीयांसोबत राहते. यापूर्वी त्या वडाळा परिसरात राहत होत्या. मात्र तेथील इमारतींचा पुनर्विकास सुरू असल्याने त्या सायन येथे राहण्यास आल्या. त्या गृहिणी आहेत, तर पती एजेंट म्हणून काम करतात. धुळवडीच्या दिवशी दुपारी सव्वा चारच्या सुमारास इमारतीखाली फेरफटका मारून घरी परतत होत्या. त्याचदरम्यान अचानक समोर उभ्या राहिलेल्या तरुणाने त्यांना अडविले. त्यांच्याकडे प्रेमाची मागणी घातली. त्यांना काही समजण्याच्या आतच त्यांच्या ओठांचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर कोणीच नसल्याने त्यांचा आवाज कोणापर्यंत पोहोचला नाही. विकृताने चुंबनादरम्यान घेतलेल्या चाव्यात त्यांच्या ओठांचा एक तुकडा खाली पडला. त्याही बेशुद्ध झाल्या. कोणी येण्याच्या आतच विकृताने तेथून पळ काढला. स्थानिकांना त्या रस्त्यांवर पडलेल्या दिसतात त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले.
हिंदुजा रुग्णालयात त्यांच्या ओठांवर प्लास्टीक सर्जरी करण्यात आली. बुधवारी त्या शुद्धीवर आल्या. आरोपीची ओळख पटविण्यासाठी पोलीस त्यांच्याकडे विचारपूस करीत आहेत. मात्र अजूनही त्या मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. स्थानिक रहिवासी, हॉटेल कामगार, सुरक्षारक्षक यांच्याकडे पोलीस तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती ठोस असे पुरावे लागलेले नाहीत. अनेक संशयितांची धरपकड करण्यात येत आहे. यापैकी काही संशयितांचे फोटो महिलेला दाखविण्यात येत आहेत.
या प्रकरणात त्या पूर्वी राहत असलेल्या ठिकाणांतील इसमांचा समावेश आहे का? त्या दिशेनेही अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)