टाळ्यांशिवाय स्नेहसंमेलन
By admin | Published: February 25, 2015 09:12 PM2015-02-25T21:12:00+5:302015-02-26T00:20:30+5:30
हिंगणगावची प्रथा : वर्षानुवर्षे पाळला जातोय ग्राम आदेश
आदर्की : कोणत्याही कार्याचे जाहीर कौतुक करायचे म्हटले की टाळ्या या आल्याच. पण फलटण तालुक्यातील हिंगणगाव हे याला अपवाद आहे. चार दशकांपूर्वी या गावातील यात्रेत टाळ्या आणि शिट्टी न वाजविण्याचा संकल्प केला गेला होता. इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही ही परंपरा येथील ग्रामस्थांनी अबाधित ठेवली आहे. हिंगणगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या स्नेहसंमेलनातही विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही टाळ्या न वाजण्याचा आदेश तंतोतंत पाळला. काही वर्षांपूर्वी गावात यात्रेच्यावेळी एक तमाशाचा फड आला होता. या फडात टाळ्या आणि शिट्या वाजवण्यावरून ग्रामस्थांत चांगलेच जुंपले होते. मारामारीचा भयंकर प्रकार पाहून त्यावेळी ग्रामस्थांनी यात्रेत शिट्ट्या आणि टाळ्या न वाजवण्याचे फर्मान काढले. ते या घडीपर्यंत पाळले गेले आहे. उडत्या चालीची गाणी असो वा अभंग, लावणी असो वा भक्ती संगीत येथील ग्रामस्थ कार्यक़्रमाचा आस्वाद घेतात. अगदीच वाटले तर त्याचे शुटिंग करतात पण त्याला दाद देण्यासाठी टाळ्या वाजवत नाहीत. स्नेहसंमेलनात नृत्याविष्कार पाहून कोणीही टाळी वाजवली नाही. अनेकांनी चिमुकल्यांची अदाकारी कॅमेराबध्द करण्यात सुख मानले. मुख्याध्यापक ए. आर. अनपट यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सुरेंद्र घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर) विद्यार्थ्यांनी जोपासली परंपरा स्नेहसंमेलनात अनेक उडत्या चालींच्या गाण्यांवर नृत्य साकारण्यात आले. आपली कला सादर करताना विद्यार्थ्यांना उत्साह वाटावा म्हणून नृत्य सुरू असताना सूत्रसंचालकाने टाळ्या वाजवण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर स्वत: मुख्याध्यापकांनी आवाहन करूनही विद्यार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष करत आपल्या पंरपरेचे जतन केले. हिंगणगावची टाळी, शिट्या न वाजविण्याची ४० वर्षांची परंपरा शालेय विद्यार्थ्यांनी कायम ठेवली. शाळेचे स्रेह संमेलन तरुण मंडळ पालक यांनी सहकार्य केले. मात्र टाळी वाजविली नाही. - ए. आर. अनपट, मुख्याध्यापक