एटीएमचा वीजपुरवठा बंद करून फसवणूक, राज्यात ६० ठिकाणी झाली चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 10:54 AM2023-01-29T10:54:48+5:302023-01-29T10:55:06+5:30
ATM : आपण एटीएममधून पैसे काढतो, तेव्हा तातडीने आपल्याला मेसेज येतो. त्यानंतर मशीनमधून पैसे येतात. या काही क्षणांच्या कालावधीत मशिनचा वीजपुरवठा बंद करून दोघा चोरट्यांनी एका बँकेच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून लाखो रुपयांना गंडा घातला.
पुणे : आपण एटीएममधून पैसे काढतो, तेव्हा तातडीने आपल्याला मेसेज येतो. त्यानंतर मशीनमधून पैसे येतात. या काही क्षणांच्या कालावधीत मशिनचा वीजपुरवठा बंद करून दोघा चोरट्यांनी एका बँकेच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून लाखो रुपयांना गंडा घातला. हे दोघे चोरटे बँकेच्या यंत्रणेशी संबंधित असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुण्यात दोन घटनांमध्ये दोन लाखांना गंडा घातला गेला आहे. राज्यभरात अशा प्रकारे ६० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी आर बी एल बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार दोघा चोरट्यांनी दिवसभरात १३ व्यवहार करून १ लाख २४ हजार रुपये काढले. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी फसवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी याच चोरट्यांनी बंडगार्डन रोडवरील पी टी गेरा सेंटर येथील आर बी एल बँकेच्या एटीएम मशिनमधूनही नऊ व्यवहार करून ७८ हजार ५०० रुपये काढून फसवणूक केली होती.
अशा प्रकारे काढायचे मशीनमधून पैसे
हे चोरटे एटीएम सेंटरमध्ये जातात. वेगवेगळी एटीएम कार्ड वापरतात. पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होत असताना त्याच क्षणी मशिनच्या वीजपुरवठ्याचे बटन बंद करून पुन्हा सुरु करतात. मशिनमधून त्यांना पैसे मिळतात. प्रत्यक्षात बँकेत मात्र व्यवहार पूर्ण न झाल्याचा संदेश मिळतो. एकाच वेळी विथड्रॉवल आणि रिव्हर्सल असे दोन्ही प्रकार घडल्याचे दिसून येते. अशा प्रकारे त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ ते १० वाजून ५४ मिनिटे या काळात पाचशे रुपये, ९ हजार, १० हजार असे एकूण ९ व्यवहार करून ७८ हजार ५०० रुपये काढले.