ऑनलाइन मास्क विक्रीतून ग्राहकांची लूट, २५ ते १५० रुपयांमध्ये मिळणाऱ्या मास्कची आता ९०० रुपयांना विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:47 AM2020-03-06T05:47:13+5:302020-03-06T05:47:26+5:30
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केवळ वैद्यकीय सेवा देणा-या व्यक्तींना एन-९५ मास्क वापरण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई : कोरोना विषाणूच्या दहशतीने हाहाकार माजवला असून राज्यात मास्कची उपलब्धता नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून मास्क आणि जंतुनाशकांच्या विक्रीतून ग्राहकांची लूटमार सुरू आहे. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केवळ वैद्यकीय सेवा देणा-या व्यक्तींना एन-९५ मास्क वापरण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणूच्या भीतीमुळे अनेक जण मास्क घालून फिरताना दिसत आहेत. काही जण तर एन-९५ प्रकारचे मास्क वापरत आहेत. शहर-उपनगरातील काही केमिस्टमध्ये मास्क आणि जंतुनाशकांची उपलब्धता नसल्याने अवघ्या २५ ते १५० रुपयांत मिळणारे मास्क ऑनलाइन बाजारपेठेत तब्बल ९०० रुपयांना मिळत आहेत. तर सॅनिटायझर्सही ३०-५० रुपयांपासून उपलब्ध होते, परंतु, ऑनलाइन बाजारपेठेत याची किंमत १५०० हजारांपासून सुरू आहे. बाजारात अनेक प्रकारचे मास्क विक्रीसाठी आले असून यामध्ये डिस्पोजल मास्क, एन-९५ मास्क, पोल्युशन मास्क यासह कपड्यांपासून तयार केलेले मास्क विक्रीसाठी आहेत. दहा रुपयांपासून दीडशे रुपयांपर्यंतच्या मास्कची विक्री केली जात आहे.
सामान्यांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्कऐवजी स्वच्छ रुमाल वापरण्याचे आवाहन सामान्यांना केले आहे. मास्क वापरण्यापेक्षाही त्यांची विल्हेवाट योग्य रीतीने लावणे आवश्यक असते. वापरलेले मास्क असेच कचरापेटीत टाकल्यास कचरा गोळा करणारी मुले, व्यक्ती यांच्या हाताला लागून त्यांना विषाणूंची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या व्यक्तींनी मास्कपेक्षा साधा स्वच्छ रुमाल नाकाला बांधला आणि वापरल्यानंतर स्वच्छ गरम पाण्यात धुणे योग्य ठरेल, असे त्यांनी सांगितले. असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइसच्या माहितीनुसार, देशात दरवर्षी २४१.३ दशलक्ष मास्क तयार केले जातात. चीनमध्ये मास्क उत्पादन करणा-या कंपन्या बंद झाल्यानंतर दुस-या देशात भारतातील मास्क जाऊ लागले आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागल्यााने मास्कच्या किमतीही ऑफलाइन बाजारातही वाढल्या आहेत.
>कस्तुरबा रुग्णालयात चार हजार मास्कचा साठा
पालिका रुग्णालयात मास्कचा तुटवडा नाही. सध्या कस्तुरबा रुग्णालयात सुमारे चार हजार मास्कचा साठा उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास मास्क आणि औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्याचे अधिकारही रुग्णालयांना दिलेले आहेत, पूर्वतयारी म्हणून पालिकेने नवा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.