पतसंस्थाच निघाली बनावट, दोनशेहून अधिक खातेदारांचे १३ कोटी घेऊन पिता-पुत्र पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:17 AM2019-02-28T05:17:45+5:302019-02-28T05:17:49+5:30
कुरार येथील घटना : नोंदणी न करताही सुरू होता आर्थिक व्यवहार
मुंबई : दोनशेहून अधिक खातेदारांचे १३ कोटी घेऊन पसार झालेल्या पिता-पुत्राने थाटलेली कालिका पतसंस्थाच बनावट निघाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच पोलीस तपासात समोर आली आहे. या पतसंस्थेने कुठल्याही प्रकारची नोंदणी केलेली नसताना, गेल्या ८ वर्षांपासून त्यांचा कारभार सुरू होता.
प्रमोदकुमार मिश्रा (५५) याने मुलगा नित्यानंद आणि नीलेशसोबत कुरार परिसरात ही पतसंस्था थाटली. येथे पैसे ठेवणाऱ्यांना ते जास्तीचे व्याज देण्याचे आमिष देत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी पतसंस्थेत गुंतवणूक केली. सुरुवातीला पतसंस्थेतून व्याजाची रक्कम मिळत असल्याने खातेदारांचा विश्वास बसला. त्यांना पतसंस्थेतून रितसर पासबुक, तसेच अन्य सुविधा पुरविल्या होत्या.
गेल्या ८ वर्षांत दोनशेहून अधिक जणांनी यात गुंतवणूक केली. मात्र, २०१७ मध्ये पैसे घेऊन शर्मा पिता-पुत्राने पळ काढला. पैसे घेऊन संचालकच पळाल्याने खातेदारांची तारांबळ उडाली. त्यांनी कुरार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. राहुल गुप्ता यांच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हा तपास मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढे तपासात ही पतसंस्था अधिकृत नसल्याचे समोर येत आहे. त्यांनी परराज्यातून बनावट प्रमाणपत्राद्वारे राजरोसपणे ठगीचा धंदा थाटला असल्याचा अंदाज आहे. तिघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यामागे कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेचे कक्ष ७ याचा अधिक तपास करत आहेत.