घर देण्याच्या नावाखाली फसवणूक, एटीएसचा निलंबित अधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:50 AM2017-09-09T04:50:03+5:302017-09-09T04:50:23+5:30
मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाºया रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक चालवत होता.
मुंबई : मुख्यमंत्री कोट्यातून म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाºया रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) निलंबित सहायक पोलीस निरीक्षक चालवत होता. त्याच्यासह तिघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. आरोपींमध्ये एका महिलेसह पुजाºयाचा समावेश आहे.
मुलुंडचा रहिवासी दिलीप भोसले (५४) हा नागपाडा एटीएसमध्ये सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. एका गुन्ह्यातील तपासावरून त्याला निलंबित केले होते. त्याच्यासह साथीदार सुनीता तूपसौंदर्य (३३) आणि गणेश पुजारी (४०) यांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील अन्य पाच ते सहा जणांचा शोध सुरू आहे.
तक्रारदार घाटकोपरच्या पंतनगर परिसरात राहतो. काही महिन्यांपूर्वी भोसले त्याच्या अन्य साथीदारांसोबत पंतनगरच्या एका हॉटेलमध्ये म्हाडात स्वस्तात घर मिळवून देण्याबाबत चर्चा करत होते. तक्रारदाराच्या मागच्याच टेबलवर ते बसले होते. तक्रारदाराने त्यांचे संभाषण ऐकून घराबाबत विचारणा केली. या रॅकेटने त्याला विश्वासात घेत मुख्यमंत्री कोट्यातून स्वस्तात घर देतो असे सांगितले. त्याने आपल्या मित्रांसोबत पैसे गुंतवले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंतनगर पोलीस ठाणे गाठले. मात्र पोलिसांनी त्याला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. गुन्हे शाखेच्या कक्ष ७कडे तक्रार दाखल होताच त्यांनी चौकशीअंती तिघांना अटक केली. आरोपींनी १० ते १२ जणांना गंडविल्याचे समोर आले आहे.
बडे मासे गळाला लागणार?
अटक तिन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता असून, काही म्हाडा अधिकारी असल्याचाही संशय गुन्हे शाखेला आहे.