विमा योजनेच्या नावाखाली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 05:25 AM2017-07-26T05:25:33+5:302017-07-26T05:25:36+5:30
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : सरकारी रुग्णालयात राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेच्या नावाखाली दुकानदारी थाटून रुग्णांची लुबाडणूक करण्याचा प्रकार ‘लोकमत’मुळे उघडकीस आला. गत १८ दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत अधिष्ठात्यांसह रुग्णालय प्रशासन अनभिज्ञ असल्याचे पुढे आले.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागासमोर कक्ष थाटून काही तरुणांनी राष्टÑीय स्वास्थ्य विमा योजनेची नोंदणी सुरू केली होती. रुग्णालयात येणाºया गोरगरीब जनतेकडून शंभर रुपये वसूल केले जात होते. ही योजना एपीएल आणि बीपीएल कुटुंबासाठी असून वार्षिक विमा योजना असल्याचे ते सांगत होते. यासाठी एक अर्ज भरून घेऊन शंभर रुपये घेण्यात येत होते. विशेष म्हणजे, अर्जावर कोणताही क्रमांक नव्हता. तसेच कुटुंबाची केवळ जुजबी माहिती घेतली जात होती. कुटुंब प्रमुखाचे आधार, रेशन कार्ड, वीज बिल आणि दोन फोटो मागविले जात होते. हा अर्ज भरल्याची रीतसर पावतीही दिली जात नव्हती.
याबाबत चौकशी केली असता अधिष्ठात्यांच्या आदेशाने हा प्रकार सुरू असून, लोहारा येथील आशिष गोल्हर नामक तरुण तालुका समन्वयक असल्याचे सांगितले. आशिष यांच्याशी मोबाइलवरून संपर्क केला असता त्याने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या निर्देशावरून ही योजना राबवित असल्याचे सांगितले. प्रस्तुत प्रतिनिधीने अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे विचारणा केल्यावर शासनाकडून असा कोणताच कार्यक्रम राबविला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सुरू असलेला विमा कार्ड योजनेचा प्रकार पूर्णत: नियमबाह्य आहे. त्यांना कोणतीही परवानगी दिलेली नाही. शिवाय अशी कुठलीही योजना नसल्याने या प्रकरणाची तक्रार पोलिसात देत आहोत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी दिली.