गुप्तदानाच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: February 5, 2017 02:15 PM2017-02-05T14:15:55+5:302017-02-05T14:15:55+5:30
गुप्तदान करायचे आहे, असे सांगून एका आरोपीने वृद्धाची सोनसाखळी चोरून नेली
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 5 - गुप्तदान करायचे आहे, असे सांगून एका आरोपीने वृद्धाची सोनसाखळी चोरून नेली. शनिवारी सकाळी १०.३० ला अजनीतील वंजारीनगरात ही घटना घडली. चंद्रोदय अपार्टमेंट येथे राहणारे मनीष जमनादास वस्तानी (वय ६२) हे त्यांच्या दुकानात बसून असता अंदाजे ५० वर्षे वयाचा आरोपी तेथे आला. त्याने वस्तानी यांना आपल्याला गुप्तदान करायचे आहे, असे सांगून १०० च्या दहा नोटा वस्तानी यांच्या हातावर ठेवल्या.
तुमच्या गळ्यातील सोनसाखळीचा या नोटांना स्पर्श करा, असे सांगून आरोपीने वस्तानी यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी काढायला लावली. ती आणि १००च्या दहा नोटा एका कागदाच्या पुडीत बांधल्या. ती पुडी हारफुलाच्या कॅरिबॅगमध्ये ठेवल्याचे भासवून आरोपी दुकानातून निघून गेला. काही वेळेनंतर पिशवी बघितली असता त्यात नोटा आणि सोनसाखळी नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वस्तानी यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.