बनावट कागदपत्रावरून लातुरात एकाची फसवणूक, न्यायालयाच्या आदेशाने चाैघांवर गुन्हा
By राजकुमार जोंधळे | Published: October 14, 2022 11:59 PM2022-10-14T23:59:09+5:302022-10-15T00:00:21+5:30
बनावट कागदपत्राच्या आधारे लातुरात एकाची फसवणूक केल्याची घटना २२ जून २०१७ ते १३ ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत घडली.
लातूर : बनावट कागदपत्राच्या आधारे लातुरात एकाची फसवणूक केल्याची घटना २२ जून २०१७ ते १३ ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत घडली. याबाबत लातूर येथील न्यायालयाच्या आदेशाने एमआयडीसी पाेलीस ठाण्यात चार जाणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी दिलेली माहिती अशी, शेख अन्सार मन्सूर (४४, रा. गिरवलकरनगर, लातूर) यांनी पाेलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी व्यवसायातील काही आर्थिक अडचणींमुळे प्रशांत भागवत ईरलापल्ले (रा. श्रीनगर, लातूर) यांच्याकडून २२ जून २०१७ राेजी राेख ६ लाख रुपये १०० दिवसांमध्ये परत करण्याच्या अटीवर घेतले हाेते. दरम्यान, ही रक्कम घेताना फिर्यादीने प्रशांत ईरलापल्ले यास तारण म्हणून काेरे स्वाक्षरी केलेले धनादेश दिले हाेते आणि १०० रुपयांचा बाॅण्डपेपर ज्यावर फिर्यादीची स्वाक्षरी असलेली अशी कागदपत्रे दिली हाेती.
दरम्यान, फिर्यादी शेख याने घेतलेली राेख रक्कम ६ लाख रुपये १०० दिवसांमध्ये परत केली. त्यानंतर तारण म्हणून ठेवलेले काेरे स्वाक्षरी केलेले धनादेश, बाॅण्डपेपर आदी कागदपत्रे परत मागितली असता, ती कागदपत्रे देण्यास नकार दिला. प्रशांत ईरलापल्ले याने पिराजी माणिक मेकले (रा. रमजानपूर, ता. लातूर), चेतन तुकाराम आकनगिरे (रा. कामखेडा राेड, रेणापूर) आणि हरिओम शरदराव भगत (रा. श्रीनगर, लातूर) यांच्याशी संगनमत करून दहा लाख रुपये देणे असल्याबाबतची खाेट्या आशयाची नाेटीस तयार करून, पाठवून काेऱ्या धनादेशाचा दुरुपयाेग करून फिर्यादीची फसवणूक केली. शिवाय, विश्वासघात करून वैयक्तिक पैशाच्या हव्यासापाेटी बनावट कागदपत्र तयार करून त्याचा वापर केला.
याबाबत फिर्यादीने लातूरच्या न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. याप्रकरणी लातूर येथील न्यायालयीन क्रमांक -२ यांच्या आदेशानुसार कलम १५६ (३) सीआरपीप्रमाणे एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुरुवारी गुरनं. ५७९ /२०२२ कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलीस उपनिरीक्षक संदीप कराड करत आहेत.