वितरकाकडून होणाऱ्या वाहन नोंदणीत फसवेगिरी
By admin | Published: August 24, 2016 02:12 AM2016-08-24T02:12:09+5:302016-08-24T02:12:09+5:30
खरेदी केलेल्या नव्या वाहनांची डीलर्सकडून आरटीओकडे नोंदच केली जात नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला
सूर्यकांत वाघमारे,
नवी मुंबई- खरेदी केलेल्या नव्या वाहनांची डीलर्सकडून आरटीओकडे नोंदच केली जात नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वाहन मालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तर आरटीओकडे नोंदच नसलेली वाहने एखाद्या गुन्ह्यात वापरली गेल्यास पोलिसांपुढे देखील तपासाचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
बदलत्या राहणीमानानुसार सध्या स्वत:चे घर झाले की कार पाहिजेच अशी नागरिकांची मानसिकता झाली आहे. त्यामुळेच ठिकठिकाणी नव्या तसेच जुन्या वाहनांची खरेदी - विक्री करणारी डीलर्सची कार्यालये ठिकठिकाणी पहायला मिळत आहेत. त्यापैकी काही डीलर्स त्यांच्याकडून खरेदी झालेल्या वाहनांची नोंद आरटीओकडे करतच नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे वाहन खरेदी करणाऱ्याकडून आरटीओच्या संपूर्ण प्रक्रियेची आवश्यक रक्कम घेवून देखील नोंदणीच्या प्रक्रियेला विलंब केला जात आहे. त्यामुळे वाहन मालकांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. असाच प्रकार कोपरखैरणेत राहणाऱ्या संदेश कुलकर्णी यांच्यासोबत घडला आहे.
कुलकर्णी यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये नेरुळच्या शोरुममधून स्विफ्ट डिझायर कार खरेदी केलेली आहे. यावेळी कारच्या नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया यांनी याच डीलरमार्फत पूर्ण केलेली होती. त्यानुसार ६२ हजार रुपये कर भरल्याची रीतसर पावती देखील त्यांना देण्यात आलेली आहे. केवळ वाहनाचा नंबर पसंतीचा पाहिजे असल्यामुळे कुलकर्णी यांनी स्वत: आरटीओ कार्यालयात जावून निवडक नंबर घेतलेला आहे. त्याची ५ हजार रुपयांची पावती देखील तत्कालीन अधिकाऱ्याने त्यांना दिलेली आहे. त्यानुसार गेली नऊ महिन्यांपासून कुलकर्णी त्यांची कार वापरत आहेत.
यादरम्यान मागील महिन्यात एका अपघातामध्ये त्यांच्या कारचे नुकसान झाले. त्याचा खर्च इन्शुरन्समार्फत मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता, त्यांच्या वाहनाची आरटीओकडे नोंदच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे कारची नोंदणी झाल्याच्या दिलेल्या पावत्या खऱ्या की खोट्या असाही प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. सदर कारचा गंभीर अपघात अथवा चोरी झाली असती, तर कुलकर्णी हे कायदेशीर अडचणीत सापडले असते. शिवाय पोलिसांपुढेही तपासाचे आव्हान निर्माण झाले असते. यामुळे मानसिक धक्का बसल्याने कुलकर्णी हे गेला महिनाभर आरटीओ तसेच वितरकाच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. त्यानंतरही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संबंधतिांवर कारवाईची मागणी संदेश कुलकर्णी यांनी केली आहे.
या प्रकारावरून वाहनांचे वितरक ग्राहकांकडून पैसे घेवूनही आरटीओकडे त्यांच्या वाहनांची नोंदच करत नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामागे मोठे रॅकेट देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय इतर वाहनांच्या बाबतीत देखील असाच प्रकार झालेला असल्यास वितरकांची कार्यपध्दतच संशयाच्या घेऱ्यात येणार आहे. तसेच या प्रकारामुळे आरटीओ व वितरक दोघांच्याही कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे.
>वाहनांची खरेदी - विक्री करणारी डीलर्सची कार्यालये ठिकठिकाणी दिसतात. त्यापैकी काही डीलर्स त्यांच्याकडून खरेदी झालेल्या वाहनांची नोंद आरटीओकडे करतच नाही. विशेष म्हणजे वाहन खरेदी करणाऱ्याकडून आरटीओच्या संपूर्ण प्रक्रियेची आवश्यक रक्कम घेवूनही विलंब केला जात आहे.
मागील महिन्यात एका अपघातामध्ये कुलकर्णी यांच्या कारचे नुकसान झाले. त्याचा खर्च इन्शुरन्समार्फत मिळवण्यासाठी प्रयत्न केले असता, वाहनाची आरटीओकडे नोंदच नसल्याचे उघड झाले. त्यामुळे कारची नोंदणी झाल्याच्या दिलेल्या पावत्या खऱ्या की खोट्या असाही प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.