गुंतवणुकीवर सव्याज रक्कम देण्याचे आमिष दाखवून केली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 08:02 PM2019-08-21T20:02:52+5:302019-08-21T20:03:24+5:30
गुंतवणुकीवर सव्याज रक्कम देण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने मंगळवारी कोतवाली पोलिसांत नोंदविली आहे.
अमरावती: गुंतवणुकीवर सव्याज रक्कम देण्याचे आमिष देऊन फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने मंगळवारी कोतवाली पोलिसांत नोंदविली आहे. याप्रकरणात पोलिसांनी समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पज को- अॅापरेटिव्ह लि.चा मालक महेश मालेवारविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
गुलशन टॉवर स्थित समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपरपज को- अॅापरेटिव्ह लि. मध्ये पैसे जमा केल्यास चांगली रक्कम व्याजासह मिळेल, असे तक्रारकर्ता महिलेच्या परिचयातील सुनील मावळे नामक इसमाने सांगितले होते. त्यानुसार त्या महिलेने मासिक पाचशे रुपये नियमित रक्कम पाच वर्षे दिले. आणखी सदस्य जोडल्यास बोनस मिळेल, असे सांगितले गेल्याने त्या महिलेने परिचयातील ४३ जणांना सदस्य बनविले. त्यांनीही सन २०१० ते २०१६ दरम्यान दरमहा रक्कम गुलशन टॉवर स्थित पतसंस्थेकडे भरली.
मात्र, मुदत संपल्यानंतर त्यांना करारनाम्यानुसार पैसे परत मिळाले नाहीत. नागरिक गुलशन टॉवर स्थित कार्यालयात पैसे मिळविण्यासाठी गेले असता, ते कार्यालय बंद दिसले. त्यांना समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टीपर्पज को- अॅापरेटिव्ह लि.च्या संचालकांनी खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची तक्रार महिलेने कोतवाली पोलिसांत नोंदविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू करीत आहेत.