हे तर फसवणूक करणारे सरकार !
By admin | Published: October 30, 2015 01:22 AM2015-10-30T01:22:28+5:302015-10-30T01:22:28+5:30
राज्यातील फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली
मुंबई : राज्यातील फडणवीस सरकार हे ‘फसवणूक’ सरकार असून जनतेच्या फसवणुकीची वर्षपूर्ती आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. सत्तेवर आल्यानंतर पहिल्या १० महिन्यांतच या सरकारने राज्यावर ५४ हजार कोटींचे कर्ज लादले. वृत्तपत्रांच्या मथळ्यात राहण्यात धन्यता मानत असलेले हे सरकार, जनतेच्या मनातून सपशेल उतरले आहे, असेही मुंडे म्हणाले.
शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील युती सरकारच्या वर्षभरातील कारभारावर टीका केली. सरकारने ३ हजार ७०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. पावसाळी अधिवेशनात १४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. दुष्काळाच्या नावावर पेट्रोल, डिझेलची करवाढ करून १६०० कोटींची अधिकची करवसुली लादली. नदी नियमन धोरण लोकाभिमुख करण्याचे आश्वासन ठरावीक उद्योजकांच्या फायद्यासाठी पहिल्या वर्षीच रद्द केले. रद्द केलेले धोरण पुन्हा लागू करण्याची नामुष्की राष्ट्रीय हरीत लवादाच्या २७ आॅक्टोबरच्या निर्णयामुळे सरकारवर आली, असे मुंडे म्हणाले.
सरकारने राज्य कृषिमूल्य आयोगाची नऊ महिन्यांपूर्वी स्थापना केली, परंतु या नऊ महिन्यांत आयोगावर सदस्य नेमले नाहीत की, आयोगाची एकही बैठक झाली नाही. जे सरकार आयोगाचे सदस्य नेमू शकत नाही, ते कृषिमालाला रास्त भाव काय देणार, असा सवालही मुंडे यांनी केला. ‘अच्छे दिन’च येणार सांगून सत्ता मिळवलेल्या सरकारने जनतेला ‘बुरे दिन’ दाखवले आहेत. ‘अब की बार.. भाजप सरकार..’ ही घोषणा ‘अब की बार... डान्स बार’ मध्ये बदलल्याचेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)