हाजीअली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा, ट्रस्टची माघार
By admin | Published: October 24, 2016 12:29 PM2016-10-24T12:29:34+5:302016-10-24T12:44:16+5:30
हाजी अली दर्गा ट्रस्टने माघार घेत महिलांना मजारपर्यंत प्रवेश करू देण्यास संमती दिली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - हाजी अली दर्ग्यातील महिला प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून महिलांना मजारपर्यंत प्रवेश करू देण्यास ट्रस्टने संमती दिली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ' हाजी अलीच्या मजारपर्यंत महिलांना प्रवेश देऊ' असे हाजी अली दर्गा ट्रस्टच्या अधिका-यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने यासाठी ट्रस्टला ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश देऊन ऐतिहासिक निर्णय दिला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात हाजी अली दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान हायकोर्टाच्या आदेशावरील स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. सुनावणीवेळी न्यायालयाने हाजी अली ट्रस्टला पुरोगामी भूमिका मांडण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार 'ट्रस्ट महिलांना दर्ग्यामध्ये प्रवेश देण्यावर रिती आणि कार्यपद्धतीच्या योजनांची सकारात्मक आखणी करत आहे', असे वकील सुब्रमण्यम यांनी सांगितले होते. अखेर आज झालेल्या सुनावणदरम्यान हाजी अली दर्गा ट्रस्टने माघार घेतली आणि महिलांचा दर्गा प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला.