अपंगांंना मिळाले मोफत कृत्रिम अवयव
By admin | Published: November 23, 2015 02:32 AM2015-11-23T02:32:08+5:302015-11-23T02:32:08+5:30
कायम कुणाच्या तरी आधाराने जीवनाचा प्रवास करणाऱ्या अपंगांना रविवारी आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली.
यवतमाळ : कायम कुणाच्या तरी आधाराने जीवनाचा प्रवास करणाऱ्या अपंगांना रविवारी आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली. ‘जवाहरलाल दर्डा फाउंडेशन’ आणि ‘साधू वासवानी मिशन ट्रस्ट’च्या वतीने हे मोफत कृत्रिम हातपाय वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृती समारंभानिमित्त येथील दर्डा मातोश्री सभागृहात रविवारी दोनशेपेक्षा अधिक अपंगांना कृत्रिम हाता-पायांचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री व ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, ‘लोकमत समाचार’ औरंगाबादचे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, कृत्रिम हातपाय तज्ज्ञ डॉ. सलील जैन, साधू वासवानी मिशनचे मिलिंद जाधव, सुशील ढगे उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र दर्डा म्हणाले, ‘अपंगांच्या जीवनात हास्य फुलले असून या सेवेमागे मानवतेची भावना आहे. बाबूजी यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र होते. यवतमाळच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले. १८ आॅक्टोबरला २२८ अपंगांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२४ अपंगांना कृत्रिम हात-पाय दिले जात आहे. शिबिरात गुडघ्याच्या वर अपंग असलेले ५५, गुडघ्याच्या खाली अपंग असलेले ९५ आणि अन्य ५५ अपंगांना हात बसविण्यात येत आहेत.’
सुशील ढगे म्हणाले, ‘मिशनच्या माध्यमातून २००७पासून राज्यातच नव्हेतर देशभरात कृत्रिम हात-पाय बसविण्याचे कार्य सुरू आहे. आतापर्यंत १८ हजार लोकांना मोफत हात-पाय बसवून देण्यात आले. यासाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कृत्रिम हात-पाय तज्ज्ञ आणि साधू वासवानी मिशनच्या तंत्रज्ञांचा या वेळी सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)