मुंबईत मोफत सायकल पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2016 04:01 AM2016-11-06T04:01:07+5:302016-11-06T04:01:07+5:30
सायकल टू वर्क ही संकल्पना मुंबईत रुजविण्यासाठी प्रथमच विनामूल्य सायकल पार्किंगची सोय महापालिका करणार आहे. याची सुरुवात ए वॉर्डपासून झाली आहे.
मुंबई : सायकल टू वर्क ही संकल्पना मुंबईत रुजविण्यासाठी प्रथमच विनामूल्य सायकल पार्किंगची सोय महापालिका करणार आहे. याची सुरुवात ए वॉर्डपासून झाली आहे. काळा घोडा, क्रॉफर्ड मार्केट, हुतात्मा चौक आणि इरोस जंक्शन येथे असे सायकल स्टँड तयार करण्यात आले आहेत.
मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण, वाहतूक आणि डिझेल वाचविण्यासाठी ‘सायकल टू वर्क’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. हुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट ही सर्वाधिक वर्दळीची ठिकाणे आहेत़ त्यानुसार पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतून सायकल पार्किंगचे स्टँड उभारण्यास सुरुवात झाली आहे. पार्किंग सायकलस्वारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ काळा घोडा येथे यापूर्वीच सायकल स्टँड बसविण्यात आले आहे. त्यापाठोपाठ शनिवारी चर्चगेट स्थानकाबाहेर इरोस चित्रपटगृहाबाहेर, क्रॉफर्ड मार्केट, हुतात्मा चौक येथील फ्लोरा फाउंटनजवळही सायकल स्टँड बसविण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
या ठिकाणी सायकलची मोफत पार्किंग
हुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉर्इंट, बलार्ड इस्टेट़
वाहनतळाची क्षमता
सरकारी व खासगी कार्यालयांमुळे अतिवर्दळीचा व उच्चभ्रू ठरलेल्या या विभागामध्ये ४७ वाहनतळ आहेत़ या वाहनतळामध्ये आठ हजार १९७ वाहनांचे पार्किंग शक्य आहे़ या ४७ वाहनतळांवर पाच हजार ६५० चारचाकी आणि दोन हजार ५४७ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे़
४७० सायकलींना मोफत पार्किंग
वाहनतळावर प्रत्येकी १० याप्रमाणे ४७० सायकलींंना मोफत पार्किंग उपलब्ध होणार आहे़