तक्रारींसाठी स्वतंत्र कक्ष!
By admin | Published: July 22, 2016 03:44 AM2016-07-22T03:44:36+5:302016-07-22T03:44:36+5:30
तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जाणार आहेत.
संतोष वानखडे,
वाशिम- स्वच्छ भारत अभियानात लोकांचा सक्रीय सहभाग वाढविणे आणि तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन केले जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरावर असा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. निर्मल भारत अभियान हे २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत मिशन म्हणून नावलौकिकास आले आहे. या अभियानांतर्गत शौचालय बांधकाम करण्याला प्रथम प्राधान्य देण्याची अट घालण्यात आली आहे. ग्रामीण भागात घरोघरी शौचालय बांधकाम करणे आणि शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन या अभियानांतर्गत केले जाते. शौचालय बांधकाम झाल्यानंतर संबंधित लाभार्थींना १२ हजार रुपयांचे अनुदानदेखील दिले जाते. अनुदान वितरणात मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी जिल्हा व राज्य स्तरावर प्राप्त झाल्याने या तक्रारींचा निपटारा ‘आॅन दी स्पॉट’ करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
>मोबाईलमध्ये शौचालयासोबत ‘सेल्फी’
लोकांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करण्यासोबतच स्वच्छतेच्या या अभियानाशी संबंधित योग्य तक्रारीची दखल तत्काळ घेण्याचा प्रयत्न ‘व्हॉट्स अप’ क्रमांकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात लोकांनी शौचालय बांधूनही प्रोत्साहन अनुदान मिळण्यास विलंब होत असल्यास त्यांनी मोबाइलमध्ये शौचालयासोबत सेल्फी फोटो काढून स्वच्छ भारत मिशन जिल्हा वाशिम येथील व्हॉट्स अप क्रमांकावर टाकल्यास त्याची जिल्हा स्तरावर तात्काळ दखल घेण्यात येईल.
- गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम