आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना पुण्यात मोफत शिक्षण
By admin | Published: November 16, 2015 03:46 AM2015-11-16T03:46:03+5:302015-11-16T03:46:03+5:30
मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलामुलींना भारतीय जैन संघटना पुढील शिक्षणासाठी पुण्यात आणणार असून, त्यांची सर्व व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे़
पुणे : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ३२५ मुलामुलींना भारतीय जैन संघटना पुढील शिक्षणासाठी पुण्यात आणणार असून, त्यांची सर्व व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे़
भारतीय जैन संघटनेतर्फे मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात २०१५मध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ४२२ कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी करण्यात आली. त्यांच्या घरात शिक्षण घेणाऱ्या मुलांची माहिती घेण्यात आली. या कुटुंबांना कशा प्रकारच्या मदतीची गरज आहे, हे समजून घेण्यात आले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे व्यापक सर्वेक्षण केल्यानंतर त्यातून ३२५ मुलांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था होण्याची गरज लक्षात आली. त्यानुसार १९३ मुले आणि १३२ मुलींची निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)
दुष्काळ व डोक्यावरील छत्र हरपल्याचा परिणाम या मुलामुलींच्या मनावरही झाला आहे़ त्यादृष्टीने त्यांचे मानसिक समुपदेशन करण्यात येणार आहे़ मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन करून त्यांची सर्वांगीण प्रगती करण्याचे उद्दिष्ट आहे. - शांतीलाल मुथा, संस्थापक अध्यक्ष, भारतीय जैन संघटना