कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र एन्ट्री
By Admin | Published: January 12, 2017 04:16 AM2017-01-12T04:16:48+5:302017-01-12T04:16:48+5:30
अकरा महिन्यांपूर्वी विद्यापीठात दाखल झालेल्या कुलगुरूंनी नवी कोरी गाडी खरेदी केल्यानंतर आता कुलगुरूंच्या
संदीप भालेराव / नाशिक
अकरा महिन्यांपूर्वी विद्यापीठात दाखल झालेल्या कुलगुरूंनी नवी कोरी गाडी खरेदी केल्यानंतर आता कुलगुरूंच्या गाडीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचे काम विद्यापीठात सध्या सुरू आहे. त्यासाठी या मार्गावरील कॅन्टीन बंद करून ते विद्यापीठाच्या मागील बाजूस स्थलांतरीत केले आहे.
‘नवा गडी नवे राज्य’ या प्रमाणे शासकीय अधिकारी बदलीच्या ठिकाणी अनेक बदल करीत असतात. त्यास कुलगुरू म्हैसेकर हे देखील अपवाद ठरलेले नाही. शासकीय शिस्तीला प्राधान्य देणारे आणि कागदाला महत्व देणारे अधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीतच विद्यापीठात ओळख झाली. त्यामुळे बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखविणाऱ्या कुलगुरूंनी फारशी चर्चा होऊ न देता नवी गाडी मिळवून त्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडून जादा खर्चाची तरतुदही करवून घेतली. त्यासोबत अन्य तीन गाड्या देखील मंजुर करण्यात आलेल्या आहेत.
शासकीय दरबारी वजन असल्यामुळे कुलगुरूंबाबत विद्यापीठात कोणताही विरोधाचा सूर निघाला नाही.कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र मार्गात त्याचा काही भाग येणार असल्याने त्यात थोडेफार बदल केले जाणार असल्याचे समजते.
मागील कुलगुरूंच्या निर्णयाची ‘फाइल’
तत्कालीन कुलगुरूंनी विद्यापीठ हित, कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि शासनदरबारी केलेला पत्रव्यवहार याची फाईल तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. या मागची विद्यापीठाची भूमिका नेमकी काय आहे, याची आजतरी कुणालाही माहिती नाही. मात्र तत्कालीन कुलगुरूंचे कोणते निर्णय फसले, त्यात पुढे काय करता येईल याबाबतचा अभ्यास केला जात असल्याचे समजते. त्यातून सकारात्मक काही घडते की त्यावर कडी केली जाते हे यथावकाश कळेलच.
प्रश्न उपस्थित
एमबीएसारख्या अभ्यासक्रमाला अद्याप एकही पूर्णवेळ शिक्षक का नियुक्त करण्यात आलेला नाही?
तीन संगणक प्रोग्रामर असताना त्यासाठी निविदा का काढली आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन कार्यालयालतील संबंधितांना निविदा देण्याच्या हालचाली सुरू आहेत का?
काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजात बदल करण्यात येऊन त्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ‘विशिष्ठ’ लोकांनाच स्थान का?
संगणकीकरण करणे, परीक्षा कक्षात कॅमेरे लावणे ही युजीसीचीच अट असताना विद्यापीठ स्वत:चाच डंका का वाजवित आहे?