पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राज्यातील 7 कोटी नागरिकांना मोफत धान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:39 PM2021-07-05T21:39:42+5:302021-07-05T21:40:33+5:30
Pradhan Mantri Garib Kalyan Yojana : देशभरातील 80 कोटी जनतेला दर महिन्याला पाच किलो गहू किंवा तांदळाचे वितरण करून हा लाभ देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तयार झालेल्या गंभीर स्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा (पीएमजीकेवाय) लाभ महाराष्ट्रातील जवळपास 7 कोटी नागरिकांना मिळाला आहे. पीएमजीकेवाय लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आघाडीवर असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वीच अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मे - जून 2021 दरम्यान 3.68 लाख मेट्रिक टन गहू आणि 2.57 लाख मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत दोन महिन्यांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रासाठी 7 लाख मेट्रिक टन धान्य देण्यात आले होते, अशी माहिती एफसीआय, महाराष्ट्रच्या महाव्यवस्थापक के.पी. आशा यांनी सोमवारी दिली.
सरकारने या योजनेला आणखी पाच महिन्यासाठी मुदतवाढ दिली आहे आणि ही गरज भागवण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ एफसीआयने अन्नधान्याची पुरेशा प्रमाणात साठवणूक केली आहे, अशी माहिती भारतीय अन्न महामंडळाच्या पश्चिम विभागाचे कार्यकारी संचालक आर. पी. सिंग यांनी दिली. महामंडळाकडे आधीपासूनच 11.02 लाख मेट्रिक टन गहू आणि 6.65 लाख मेट्रिक टन तांदळाचा साठा आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व महसूल जिल्ह्यांमध्ये अन्नधान्याचा अखंडित पुरवठा करता यावा यासाठी यामध्ये दोन लाख मेट्रिक टन गहू आणि 1.5 लाख मेट्रिक टन तांदळाची भर घालण्यात आली आहे. एफसीआयने वेळेवर कृती केल्यामुळे अन्नधान्याच्या पुरवठा साखळी व्यवस्थापनामध्ये कोणतेही अडथळे आले नाहीत. एफसीआयच्या स्वतःच्या किंवा भाड्याने घेतलेल्या आगारांमध्ये अन्नधान्य मुबलक प्रमाणात आहे, असे आर. पी. सिंग यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील 7 कोटी आणि गोव्यातील 5.32 लाख नागरिकांना मे 2021 पासून #PradhanMantriGaribKalyanAnnaYojana योजनेचा लाभ मिळाला आहे - आर.पी.सिंग, कार्यकारी संचालक, (पश्चिम क्षेत्र), @FCI_India यांची माहिती. pic.twitter.com/mgzJUFlAup
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) July 5, 2021
दरम्यान, कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 23 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएमजीकेएवाय योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. देशभरातील 80 कोटी जनतेला दर महिन्याला पाच किलो गहू किंवा तांदळाचे वितरण करून हा लाभ देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी सुमारे 67,266 कोटी रुपयांचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याव्यतिरिक्त हे मोफत धान्य दिले जाणार आहे.