विद्यार्थिनींना जूनपासून उच्च शिक्षण मोफत; राज्य सरकारची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 09:57 AM2024-02-11T09:57:52+5:302024-02-11T09:58:32+5:30
चंद्रकांत पाटील : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद
जळगाव : राज्यातील मुलींना अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना जून २०२४ पासून कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे आणि नव्याने सुरू झालेल्या योगशास्त्र पदव्युत्तर विभागाचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री पाटील यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी संवाद साधला. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.पी. इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी भाषणापूर्वी विद्यार्थी व प्राध्यापकांनी त्यांचे प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपात मांडावेत, असे आवाहन केले. जामनेर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने गरीब विद्यार्थ्यांना स्वस्त दरातील वसतिगृह व भोजन, कमी शुल्क, अशी सवलत मिळण्याची मागणी केली. त्यावर बोलताना पाटील यांनी जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री शिंदे हे स्वत: संवेदनशील असल्यामुळे परभणीतील एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर त्यांनी मुलींच्या शुल्क माफीविषयी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.