राज्यातील 2315 शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:10 PM2019-02-19T16:10:22+5:302019-02-19T16:11:20+5:30

राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना सुरु करण्यात आली असून गेल्या वर्षभरात आतापर्यंत सुमारे 80 लाख रुग्णांच्या सुमारे 100 प्रकारच्या विविध अशा 1 कोटी 82 लाख वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या

Free Laboratory Test Diagnostic Scheme in 2315 Government Health Institutions in the State | राज्यातील 2315 शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना

राज्यातील 2315 शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना

googlenewsNext

मुंबई - राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना सुरु करण्यात आली असून गेल्या वर्षभरात आतापर्यंत सुमारे 80 लाख रुग्णांच्या सुमारे 100 प्रकारच्या विविध अशा 1 कोटी 82 लाख वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या आहेत. राज्यातील 2315 आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जात आहे. ठिक ठिकाणच्या आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करतानाच त्या भागात पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करुन दिले जात आहेत.

विविध आजारांच्या निदानासाठी रक्त, मुत्र, थूंकी तपासणे आदी प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्याची आवश्यकता भासते. या चाचण्या करण्यासाठी येणारा खर्च पाहता सर्व सामान्य नागरिकांना या चाचण्यांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क अदा करावे लागू नये म्हणून गेल्या वर्षी राज्य शासनाने एचएलएल लाईफ केअर संस्थेसोबत करार करुन त्यामार्फत विविध आरोग्य निदान चाचण्या मोफत केल्या जात आहेत.

या प्रकल्पानुसार करार केलेल्या संस्थेमार्फत प्रयोगशाळा राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये सुरु केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर 25 प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जातात. ग्रामीण रुग्णालय,  उप जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी 32, उपजिल्हा रुग्णालय (100 खाटांपेक्षा अधिक), महिला रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय आणि विभागीय संदर्भ रुग्णालयात 46 प्रकारच्या चाचण्या तर 6 प्रकारच्या विशेष चाचण्या या प्रकल्पांतर्गत केल्या जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्ताशी संबंधीत विविध चाचण्या (हिमॅटोलॉजी), थॉयराईड, मलेरिया, मायक्रोबायोलॉजी आदी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्यासाठी येणारा खर्च शासनामार्फत अदा केला जात आहे असे, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 80 लाख रुग्णांच्या विविध चाचण्या केल्या मोफत-आरोग्यमंत्री

या उपक्रमांतर्गत 1818 प्राथमिक आरोग्य केंद्र, 423 ग्रामीण रुग्णालय आणि 74 जिल्हा रुग्णालय असे एकूण 2315 आरोग्य संस्थांमध्ये मोफत प्रयोगशाळा चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत 35 जिल्ह्यांमध्ये सुमारे 80 लाख रुग्णांच्या नि:शुल्क प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या असून सुमारे 1 कोटी 82 लाख 52 हजार 367 विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, असे आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आरोग्य संस्थांच्या स्तरावर कलेक्शन केलेले सॅम्पलचे अहवाल संबंधित आरोग्य संस्थेच्या ई-मेल आयडीवर उपलब्ध करुन दिले जातात. तसेच चाचणीच्या रिपोर्टसच्या प्रती संबंधित आरोग्य संस्थेच्या अधिकाऱ्याकडे दिल्या जातात. या उपक्रमामुळे सामान्यांना शासकीय आरोग्य संस्थेमध्येच प्रयोगशाळा चाचणीची सोय उपलब्ध झाल्याने त्यांना अन्यत्र जावे लागत नाही. त्यामुळे त्याचा वेळ आणि खर्चात बचत होत असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.
 

Web Title: Free Laboratory Test Diagnostic Scheme in 2315 Government Health Institutions in the State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.