दावचवाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ग्रंथालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 03:04 PM2017-04-02T15:04:10+5:302017-04-02T15:04:10+5:30
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढी मोबाईल , वॉटस्अप, इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटत असताना वाचनालय , ग्रंथालयाच्या पायऱ्या नवीन पिढीला
ऑनलाइन लोकमत
निफाड (नाशिक), दि. 2 - आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढी मोबाईल , वॉटस्अप, इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटत असताना वाचनालय , ग्रंथालयाच्या पायऱ्या नवीन पिढीला चढायला वेळ नाही. आजची पिढी ही वाचनापासून दूर होत चाललेली असताना बालपणापासूनच वाचनाची गोडी लागावी, थोर व्यक्तिंची चरित्रे वाचून प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांच्या वैचारिक कक्षा रुंदाव्यात या उद्देशाने तालुक्यातील दावचवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत स्वतंत्र ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
या ग्रंथालयाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शाळेच्या मुख्याध्यापक सविता वैद्य यांच्या कल्पनेतून या शाळेत इ-लायब्ररी तयार करण्यात आली. विद्यार्थी,शिक्षक आता एका क्लिक वर एलइ डी पडद्यावर विविध पुस्तकांचे वाचन करु शकणार आहेत. तसेच मराठीतील अनेक साहित्य, गोष्टींची पुस्तके, वैज्ञानिक पुस्तके, आत्मचरित्र, मराठी शब्दकोश, गीता, काव्यसंग्रह, विनोदी पुस्तकें, कला, कार्यानुभव विषयक, हस्तपुस्तिका अशा अनेक पुस्तकांचा संग्रह येथे वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे.. विद्यार्थी वाचन विभाग, शिक्षक वाचन विभाग व पालक वाचन विभाग असे विभाग येथे करण्यात आलेले आहे.दैनिक नियोजनात ४५ मिनिटांची तासिका ह्या ग्रंथालयासाठी ठेवण्यात आलेली आहे. दावचवाडी येथील शाळेत ‘इ-लायब्ररी’ तसेंच ‘स्वयंअध्ययन माझी अभ्यासिका’ या स्वतंत्र कक्षाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी योगेश्वर मोरे, दत्तात्रेय कुयटे,योगेश कुयटे,दशरथ शिंदे,आजिम शेख,उमेश पवार, सुनिता गायकवाड उपस्थित होते. बीट विस्तार अधिकारी चव्हाण साहेब, केंद्रप्रमुख भारती लोहिते यांनी या शाळेतील इ-लायब्ररीस भेट देऊन समाधान व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.