VIDEO : चिपळुणात मुख्य रस्त्यावर मगरींचा होतोय मुक्तसंचार
By संदीप बांद्रे | Published: July 1, 2024 03:38 PM2024-07-01T15:38:16+5:302024-07-01T15:45:47+5:30
चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचे प्रमाण खूपच वाढले आहे
चिपळूण : गेल्या काही दिवसांत शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचा वावर वाढला आहे. अशातच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरच रात्रीच्या वेळी मगरींचा मुक्तसंचार वाढला आहे.
शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगदी रहदारी असलेल्या बाजारपूल व शिवनदी पुलानजीक भल्या मोठ्या मगरींचे दर्शन नेहमी होते. त्यातच आता मगरींच्या पिल्लांचे प्रमाणही वाढले आहे. या दोन्ही नद्यांमध्ये जागोजागी मगरी दिसू लागल्या आहेत. आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चिपळून बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरच रात्रीच्या वेळी मगरींचा मुक्तसंचार#chiplunpic.twitter.com/Pf1tFisJwZ
— Lokmat (@lokmat) July 1, 2024
शहरातील गोवळकोट चर येथे कायम मगरी असतात. साधारण तीन फुटापासून दहा फूट लांबीच्या मगरी येथे आहेत. सुमारे 60 हुन मगरींचे वास्तव्य या परिसरात आहेत. रस्त्यावरून येता-जाता येथे मगरी दिसतात. हे ठिकाण 'मगर पॉईंट'म्हणून पर्यटकांमध्ये परिचित आहे. या ठिकाणच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र निधी अभावी हे काम रखडले. आता शहरातील अन्य भागातही मगरीचा वावर वाढला आहे. या मगरी रात्रीच्या वेळी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांमध्येही भीती व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेतील शिव नदी पुलावर दहा फुटी मगर मुक्तपणे संचार करत होती. हा प्रकार काही वाहन धारकांनी कॅमेरा बद्ध केला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नैसर्गिक अधिवास धोक्यात
गेल्या चार महिन्यांपासून वाशिष्ठी व शिवनदीत गाळ उपासाचे काम सुरु होते. या मोहिमेत दोन्ही नद्यांच्या किनाऱ्यावर उत्खनन करण्यात आले. तसेच किनाऱ्यावरील झाडीझुडुपे तोडण्यात आली. त्यामुळे या भागातील जलचर प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला. विशेषतः मागरींच्या अधिवासास अधिक धोका पोहचला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.