पेपर तपासणीचा मार्ग मोकळा

By Admin | Published: March 16, 2017 04:02 AM2017-03-16T04:02:27+5:302017-03-16T04:02:27+5:30

बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकत असहकार आंदोलन सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अखेर

Free papers check | पेपर तपासणीचा मार्ग मोकळा

पेपर तपासणीचा मार्ग मोकळा

googlenewsNext

मुंबई : बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकत असहकार आंदोलन सुरू केलेल्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने अखेर १२ दिवसांनंतर आंदोलन मागे घेतले आहे. शिक्षणमंत्री व वित्तमंत्री यांच्या संयुक्त बैठकीत लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलन मागे घेत असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली.
देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व शिक्षण मंत्री, अर्थ मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, राज्य मंडळ, अर्थ व शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकींमध्ये प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत. शिवाय सरकारकडून लिखित आश्वासन देण्यात आले. त्यात २ मे २०१२नंतर नियुक्त शिक्षकांच्या नियुक्ती मान्यतेसाठी १५ ते १९ एप्रिल २०१७ या कालावधीत विशेष वैयक्तिक मान्यता शिबिरे घेण्याचे सरकारने मान्य केले आहे. शिवाय २००३ ते २०१०-११पर्यंतच्या मंजूर वाढीव पदांवरील नियुक्ती मान्यता राहिलेल्या(५९९) शिक्षकांनाही एप्रिल २०१७मधील विशेष मान्यता शिबिरांमध्ये मान्यता देण्यात येईल, त्यानंतर त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, असेही सरकारने लेखी दिले आहे. यासोबतच मे २०१७मध्ये शिक्षण मंत्री व संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत राज्य महासंघाची आढावा बैठकही घेण्यात येणार असल्याचे महासंघाने सांगितले. तर संचालकांबरोबर मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी बैठक आयोजित केल्याचे महासंघाने स्पष्ट केले. तरी पेपर तपासणीस सुरुवात झाली असून, बारावीचा निकाल वेळेत लागेल, अशी शाश्वतीही महासंघाने दिली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Free papers check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.