बारावी प्रवेशाचा मार्ग मोकळा, विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:04 AM2018-05-05T06:04:05+5:302018-05-05T06:04:05+5:30
बारावी प्रवेशाची प्रक्रिया आॅफलाइन होत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. हे प्रवेश आॅनलाइन घेण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, याबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेश आॅफलाइन घ्यावा की नाही, असा प्रश्न उभा राहिला होता.
मुंबई - बारावी प्रवेशाची प्रक्रिया आॅफलाइन होत असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो. हे प्रवेश आॅनलाइन घेण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, याबाबत शासनस्तरावर कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेश आॅफलाइन घ्यावा की नाही, असा प्रश्न उभा राहिला होता. परंतु वेळेत हा निर्णय होत नसल्याने बारावीचे प्रवेश रखडले होते. अखेर ही प्रवेश प्रक्रिया आॅफलाइन पद्धतीने राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून गुरुवारी यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले.
अनेक महाविद्यालयांमध्ये अकरावीत मुले नापास होतात किंवा काही कारणांमुळे महाविद्यालय सोडून जातात परिणामी तेथेही बारावीसाठी काही जागा रिक्त होतात. त्यामुळे त्या जागांवर प्रवेश प्रक्रिया पार पडते. अकरावी आॅनलाइनमध्ये आपल्याला पाहिजे ते महाविद्यालय मिळाले नाही म्हणून काही विद्यार्थी बारावीच्या या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात, असे समोर आले. ही प्रक्रिया आॅफलाइनच होत असल्यामुळे येथे अनेक आर्थिक व्यवहार होतात. त्यामुळे अकरावी प्रवेश आॅनलाइन करण्याच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. यंदा बारावी प्रवेश आॅफलाइन कह आॅनलाइन होणार, याबाबत संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर बारावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सूचना प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे उपसंचालक विभागातर्फे सांगण्यात येत होते. मात्र आता शासनाने बारावी प्रवेश आॅफलाइन होणार अशा सूचना जारी केल्या आहेत. प्रवेश आॅफलाइनच ठेवण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना बारावीत पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे शक्य होईल.