भुसावळ-जळगाव दरम्यान नवीन रेल्वेगाडयांचा मार्ग मोकळा
By admin | Published: November 5, 2016 09:25 AM2016-11-05T09:25:23+5:302016-11-05T09:25:56+5:30
भुसावळ-जळगाव दरम्यान २५ कि.मी. लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम एकाचवेळी होणार असल्याने नवीन गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंढरीनाथ गवळी, ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. ५ - भुसावळ-जळगाव दरम्यान २५ कि.मी. लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम एकाचवेळी होणार असल्याने नवीन गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ-जळगाव या २५ कि.मी. लांबीच्या चौथ्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता या मार्गाच्या उभारणीलाही रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे.
२६१.६७ कोटींचे अंदाजपत्रक
भुसावळ-जळगाव या २५ कि.मी.चा चौथा रेल्वे मार्ग उभारण्यासाठी अंदाजे २६१.३७ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतचे अंदाजपत्रक मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाला सादर करण्यात आले आहे.
तिसरा आणि चौथा या दोन्ही मार्गांची सोबतच उभारणी केली जाणार आहे. मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
मार्गासाठी अत्यंत आवश्यक अशी चार कि.मी. इतकी जमीन भू-संपादनाची प्रक्रिया बाकी आहे. ही जमीन तरसोद, नशिराबाद व असोदा या तीन गावांच्या शिवारातील आहे. जमीन संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव प्रलंबित आहे. २०१३ च्या नवीन कायद्यानुसार भू-संपादन प्रक्रिया राबविली जात आहे.
मनमाड-इंदूर सर्वेक्षणासाठी निविदा
४मनमाड-इंदूर या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी महिनाभरात निविदा प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी सर्वेक्षण पूर्ण होईल. पाचोरा-जामनेर ही रेल्वे बोदवडपर्यंत व पहूर-अजिंठा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.
जळगाव-मनमाड तिसऱ्या मार्गासाठी अहवाल
४यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या जळगाव-मनमाड या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना या महिन्यात सादर करण्यात येणार आहे.
भुसावळ-जळगाव अत्यंत व्यस्त मार्ग
भुसावळ रेल्वेस्थानक महत्त्वाचे आहे. नागपूर व दिल्लीकडून प्रत्येकी दोन मार्ग भुसावळात येतात. अशाच पद्धतीने जळगाव येथून मुंबई व सुरतकडे दोन मार्ग जातात.भुसावळ-जळगाव दरम्यान दोनच मार्ग आहेत. त्यामुळे हा मार्ग अत्यंत व्यस्त असून कोणतीही नवीन रेल्वे सुरू करणे कठीण आहे.
२५ कोटींची बचत...
रेल्वेच्या बांधकाम विभागाने तिसरा रेल्वे मार्ग उभारणीचे नियोजन केले आहे.त्यासाठी जळगाव-भुसावळ दरम्यान भादलीजवळ वळण तयार करून मातीचा भराव टाकून पुलाची उभारणी केली. त्यामुळे खालून व वरून रेल्वेमार्ग राहणार आहे.तसा पूलही आकारास येत आहे.या नवीन तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वेचा २५ कोटी रुपयांचा निधी वाचला. डीआरएम सुधीरकुमार गुप्ता आणि सहकाऱ्यांनी यासंबंधी नियोजन केले.