राज्यभरातील कर्करुग्ण महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन

By Admin | Published: July 6, 2017 07:18 PM2017-07-06T19:18:13+5:302017-07-06T19:19:02+5:30

राज्यभरातील तब्बल ३० हजार कर्करुग्ण महिलांना या महिन्यापासून वर्षभर मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहेत.

Free sanitary nipkins for cancerous women across the state | राज्यभरातील कर्करुग्ण महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन

राज्यभरातील कर्करुग्ण महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन

googlenewsNext

- गजानन दिवाण/ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 06 - राज्यभरातील तब्बल ३० हजार कर्करुग्ण महिलांना या महिन्यापासून वर्षभर मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहेत. उपचारासाठी होणाऱ्या खर्चाला वैतागलेल्या या महिलांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. मुंबईत सात दिवसांच्या उपोषणाच्या काळात मिळालेल्या मदतीतून लातूर जिल्ह्यातील एका महिलेने सामाजिक जाणिवेतून ही जबाबदारी उचलली आहे.
बचत गटांनी तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून वगळा यासह इतर मागण्यांसाठी पारधेवाडी (जि. लातूर) येथील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव छाया काकडे यांनी २१ ते २७ जूनदरम्यान मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केले. या आंदोलनात जवळपास २५ हजार महिलांनी सहभाग नोंदविला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर २७ जून रोजी त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. या आंदोलनाच्या काळात सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांनी सॅनिटरी नॅपकिन चळवळीला आर्थिक मदत केली. कोणी आंदोलनस्थळी येऊन मोहीम बळकट केली, तर अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या महिलांनी मीडियापासून दूर राहण्यासाठी घरी बोलावून मदत दिली. आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी ती तब्बल ७५ लाख रुपयांपर्यंत पोहोचली, अशी माहिती छाया काकडे यांनी ‘लोकमत’ला दिली. या पैशांमधून राज्यभरातील कर्करुग्ण महिलांना वर्षभर मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. यातील अनेक महिलांना उपचाराचा खर्च परवडणारा नसतो. अशा वेळी त्या सॅनिटरी नॅपकिनचा खर्च कशा भागवतील? मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिनचा वापर न केला तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात अशा महिलांची संख्या ३० हजारांच्या घरात आहे.
कमीत कमी पैशांत आणि गरीब गरजूंना मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळावे, यासाठी औसा (जि. लातूर) तालुक्यातील पारधेवाडी येथे विचारधारा महिला बचत गटाच्या वतीने जानेवारी २०१६ मध्ये रिफ्रेश नावाने सॅनिटरी नॅपकिनचा प्रकल्प सुरू झाला. ‘आरोग्य तिथे संपदा’ या टॅगलाईनने सुरू झालेल्या या प्रकल्पातून आंतरराष्ट्रीय स्टॅण्डर्डचे उत्पादन होत असल्याने अमेरिका आणि दुबईत महिन्याला ६० हजार पॉकेटची निर्यात केली जाते. खरेदी करण्याची कुवत नसलेल्या लातूर जिल्ह्यातील १८०० महिला-मुलींना दर महिन्याला मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जात असल्याचे काकडे यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात बचत गटाचा सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प
पारधेवाडी येथे विचारधारा महिला बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील ५०० गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिन चळवळ पोहोचली आहे. अशी चळवळ प्रत्येक जिल्ह्यात निर्माण व्हावी यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांत महिला बचत गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. यासाठी त्यांना राज्य शासन मदत करणार आहे. आॅगस्टअखेरपर्यंत हे सर्व प्रकल्प सुरू होतील. या माध्यमातून जवळपास पावणेदोन लाख महिलांना रोजगार मिळणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

बचत गटांच्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून वगळले
छाया काकडे यांच्यासह हजारो महिलांनी मुंबईत केलेल्या उपोषणामुळे बचत गटांनी तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून वगळण्याचा निर्णय झाला. १ जुलैपासून त्याची अंमलबजावणीही झाली. या निर्णयाचा फायदा देशभरातील बचत गटांना होणार आहे. याशिवाय कर्करुग्ण महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन व इतर आरोग्य सुविधा, माध्यमिक शाळांत सॅनिटरी वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविणे बंधनकारक, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन महिला बचत गटांना चालविण्यास देणे आणि रेशनिंगवर सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय १५ आॅगस्टपर्यंत घेतला जाणार आहे.

Web Title: Free sanitary nipkins for cancerous women across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.