आदिवासी विद्यार्थ्यांना विनाअट शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 02:46 AM2021-02-12T02:46:36+5:302021-02-12T02:46:50+5:30
संभ्रम दूर; ८० टक्के उपस्थितीची अट सरकारने केली शिथिल
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : शाळेत ८० टक्के उपस्थिती असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी कोरोनामुळे पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शिष्यवृत्ती मिळेल की नाही, असा संभ्रम होता. मात्र, शासनाने विनाअट शिष्यवृत्ती देण्याचे नुकतेच जाहीर केल्यामुळे राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अनुसूचित जमातीतील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी तत्कालीन राज्य सरकारने २०१० मध्ये सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. यासाठी ८० टक्के उपस्थितीची अट आहे. दरवर्षी मुख्याध्यापकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यानंतर ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली जाते. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे शाळा पूर्णपणे सुरूच झाल्या नाहीत. जे वर्ग सुरू झाले त्यामध्ये पूर्ण क्षमतेने विद्यार्थी उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे. तर पहिली ते चौथीच्या शाळा सुरूच झाल्या नसल्याने ८० टक्के उपस्थितीच्या अटीमुळे यावर्षी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. आदिवासी विकास विभागाने एक पत्र काढून उपस्थितीबाबतची अट शिथिल केल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना संकटामुळे पहिली ते चौथीच्या शाळा अद्याप सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे हजारो विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शासनाने उपस्थितीच्या अटीमध्ये शिथिलता दिल्यामुळे लाभ मिळणार आहे.
- जे. डी. पोटे, शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर.