शिक्षणापासून वंचितांसाठी आता मुक्त विद्यालय मंडळ
By admin | Published: July 15, 2017 05:29 AM2017-07-15T05:29:59+5:302017-07-15T05:29:59+5:30
शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने आज घेतला
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुक्त विद्यापीठांच्या धर्तीवर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या आबालवृद्धांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने आज घेतला. या मंडळांतर्गत होणाऱ्या परीक्षांना नियमितपणे घेण्यात येणाऱ्या पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षांची समकक्षता असेल.
या मंडळाच्या माध्यमातून औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती लागू केली जाणार आहे. मुलामुलींसह शिक्षण घेऊ इच्छिणारे प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार या सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्यात सोयीनुसार अध्ययनाची सवलत असेल. अभ्यासक्रमात लवचितकता राहील. व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था असेल. इयत्ता पाचवीच्या समकक्ष शिक्षणासाठी विद्यार्थ्याचे वय किमान दहा वर्षे असावे, पूर्वी औपचारिक शाळेत गेला असल्यास तेथील शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे, अशा शाळेत गेलाच नसेल तर स्वयंघोषित प्रमाणपत्र द्यावे अशा अटी असतील.
इयत्ता आठवीच्या समकक्ष शिक्षणासाठीचे वय किमान १३ वर्षांचे राहील तर कमाल वयाला मर्यादा नसेल. इयत्ता दहावीच्या समकक्ष शिक्षणासाठी वयाची किमान मर्यादा १५ वर्षे असेल. कमाल अट नसेल. किमान इयत्ता पाचवी उत्तीर्ण असावा, राहील. महाराष्ट्रात दोन वर्षांचे वास्तव्य असावे. इयत्ता बारावीच्या समकक्ष शिक्षणासाठी किमान वय १७ वर्षे असावे, अशा अटी असतील. सर्व अभ्यासक्रम हे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ निश्चित करेल. कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम त्यात समाविष्ट असतील.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियामक मंडळ असेल आणि पुणे येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हे या मंडळाचेही अध्यक्ष असतील. तसेच सदस्यांमध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.