दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकऱ्यांना मोफत बियाणे; अर्थसंकल्पात तरतूद करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 03:56 AM2019-06-04T03:56:13+5:302019-06-04T06:34:44+5:30
फक्त दुष्काळग्रस्त गावांसाठी ही योजना असेल. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी लागली तर ती केली जाईल
अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यातील २८ हजार ५२४ दुष्काळग्रस्त गावांतील शेतकऱ्यांना बियाणे मोफत देण्याची योजना महसूल व कृषी विभागाने तयार केली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही केली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्यात ४०,९५९ गावे आहेत.
पाटील म्हणाले की, दुष्काळग्रस्त गावांतील शेतकºयांना पाऊस सुरू होताच बियाणांची गरज लागेल. त्यासाठी शेतकरी कर्ज काढतो. ही अडचण सोडविण्याची सरकारने योजना आखली आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना एरवीही सवलतीच्या दरात बियाणे दिली जातात. या वर्षी सरकार ही बियाणे मोफत देईल. ती कोणाला द्यायची, त्यासाठीचे निकष व नियम विभागातर्फे तयार केले जात आहेत, असे सांगून महसूलमंत्री म्हणाले की, फक्त दुष्काळग्रस्त गावांसाठी ही योजना असेल. त्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी लागली तर ती केली जाईल. याविषयीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवत आहोत. दुसरी अडचण मुलींच्या शाळाप्रवेशाची येते. दुष्काळ असताना तू कशाला या वर्षी शाळेत जाते, असे शेतकरी मुलींना विचारतात. त्यामुळे दुष्काळग्रस्त गावांमधील मुलींच्या शिक्षणासाठी सर्व सुविधा देण्याचा प्रस्तावही तयार होेत असून त्याविषयी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करा अशी विनंती केल्याचेही पाटील म्हणाले.
६६४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सध्या
१५८३ चारा छावण्यांत १० लाख ६८ हजार ३७५ गुरे आहेत, असे सांगून महसूल सचिव किशोरराजे निंबाळकर म्हणाले की, ५१२७ गावांना ६६४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. विभागाने १ डॉपलर रडार व एक विमान औरंगाबादेत तयार ठेवले असून ढगांचा अंदाज घेऊन त्याच्या साह्याने कृत्रिम पावसासाठी फवारणी केली जाईल. मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पुणे जिल्ह्यातील काही भाग व विदर्भातील काही भागांत ढगांच्या हालचालींवर लक्ष आहे.