आचरा तिठ्यावर राजकीय नेत्यांत फ्री स्टाईल
By Admin | Published: November 2, 2016 05:23 AM2016-11-02T05:23:12+5:302016-11-02T05:23:12+5:30
राजकारणातून वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे दोन नेते गेले असता आचरा तिठ्यावर शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
आचरा : राजकारणातून वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी दुसऱ्या पक्षाचे दोन नेते गेले असता आचरा तिठ्यावर शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
हा वाद दोन दिवस धुमसत होता. त्याचे रूपांतर मारामारीत झाले. काही स्थानिकांनी हस्तक्षेप करत वाद मिटविण्याचा प्रयत्न करत त्यांची समजून काढली. शेवटी दोन्ही गटाच्या नेत्यांनी आचरा पोलिस ठाणे गाठले. तडजोडीनंतर आपापसात वाद मिटवित त्यांनी घर गाठले.
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणानंतर आचऱ्यात सर्वच पक्षांमध्ये तिकीट मिळविण्यावरून धडपड चालू झाली आहे. यावरून दोन पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी परस्पर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली होती. यातूनच हा वाद सुरू झाला होता. याचे पर्यवसान सोमवारी सकाळी मारामारीत झाले.
या राजकीय नेत्यांच्या हाणामारीनंतर आचरे गावात दोन पक्षांचे कार्यकर्ते भिडून हाणामारी झाल्याची अफवा आचरा येथे वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे काहीकाळ आचऱ्यातील वातावरण तंग बनले होते. ही माहिती मिळताच प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आचरा पोलिस ठाण्यात धाव घेत होता.
दोन राजकीय गटांमध्ये गैरसमजुतीने झालेला वाद आपापसात मिटविण्यात आला असून याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असे आचरा पोलिसांकडून सांगण्यात
आले. (वार्ताहर)
>पोलीस ठाण्यात तडजोडीने मिटविला वाद
हाणामारीनंतर दोन्ही पक्षांचे नेते आचरा पोलिस ठाण्यात दाखल होत परस्परविरोधी तक्रारी देण्याच्या तयारीत होते. दोन्ही पक्षांतील कार्यकर्तेही जमले होते. काही कार्यकर्ते वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेत होते. एका राजकीय पक्षाचे तालुकाप्रमुखही पोलिस ठाण्यात हजर झाले होते. वाद वाढविण्यापेक्षा आपापसात समजुतीने मिटविण्याचे दोघांमध्ये एकमत झाल्याने वादावर तात्पुरता पडदा पडला.