महिलांना ८ मार्चला रिक्षातून मोफत प्रवास
By admin | Published: March 7, 2017 02:27 AM2017-03-07T02:27:16+5:302017-03-07T02:27:16+5:30
महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सेवेकरिता रिक्षा चालक संघटनेने पुढाकार घेतला आहे.
नवी मुंबई : महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या सेवेकरिता रिक्षा चालक संघटनेने पुढाकार घेतला आहे. याकरिता महिला दिनी घणसोली ते वाशी रेल्वे स्थानकदरम्यान महिलांना रिक्षातून मोफत प्रवास दिला जाणार आहे. यामध्ये महिला चालकांच्या अबोलीसह ५० हून अधिक रिक्षांचा समावेश आहे.
आदर्श सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने महिला दिनी महिलांना रिक्षाने मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आली आहे. घणसोली डीमार्ट ते वाशी रेल्वे स्थानक या मार्गावर महिलांना ही सुविधा मिळणार आहे. त्याकरिता या उपक्रमात संघटनेशी संलग्न असलेल्या ५० रिक्षा सहभागी होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी सांगितले. तर महिला चालक असलेली अबोली रिक्षा देखील या उपक्रमात सहभागी असणार आहे. आजवर घडलेल्या थोर व्यक्तींमागे महिलांचे मोलाचे योगदान आहे. सध्या महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. अशा थोर महिलांच्या सन्मानार्थ महिला दिनी रिक्षातून महिलांना मोफत प्रवास दिला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. घणसोली ते वाशीदरम्यानच्या प्रत्येक थांब्यावरून महिलांना या संघटनेच्या रिक्षांमधून प्रवास करता येणार आहे. (प्रतिनिधी)