घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:26 AM2018-11-23T00:26:19+5:302018-11-23T00:26:33+5:30

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे जिल्ह्यातील काम केवळ रेती अभावी अडले होते. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नव्हती. आता घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास प्रशासन तयार झाले असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत.

Free two brass sand for the house | घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती

घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची मान्यता : तहसीलदार करणार रेतीची व्यवस्था

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे जिल्ह्यातील काम केवळ रेती अभावी अडले होते. रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नव्हती. आता घरकुलासाठी विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास प्रशासन तयार झाले असून तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना दिले आहेत. लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर त्यांना विनामूल्य रेती उपलब्ध होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेकडो घरकुल मंजूर झाले आहेत. दिवाळीपूर्वी आपल्या हक्काच्या घरात जाता येईल, असे लाभार्थ्यांचे स्वप्न होते. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला. जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीच उपलब्ध होत नव्हती. विशेष म्हणजे चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध असली तरी लाभार्थ्यांना ती रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे होते. परिणामी जिल्ह्यातील शेकडो घरकुलाचे बांधकाम रखडले होते. ही बाब तुमसर - मोहाडीचे आमदार चरण वाघमारे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. सातत्याने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. घाटाचे लिलाव बंद असले तरी गरीब लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम प्रलंबित राहू नये यासाठी शासनाने विनामुल्य दोन ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यावरून भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून संबंधित तहसीलदारांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आता विनामूल्य रेती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या वाहनाने रेतीची वाहतूक करण्यात येणार आहे, त्या वाहनाचे क्रमांकही अर्जात द्यावे लागतील.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील गरीब, गरजू लाभार्थ्यांना विनामुल्य रेती उपलब्ध होऊन आपल्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीघाट आहे. परंतु या रेतीघाटांचा लिलाव रखडलेला आहे. मात्र अनेक रेती घाटातून खुलेआम रेतीची तस्करी सुरु आहे. शेकडो वाहनातून दररोज रेतीची वाहतूक होत आहे. या रेती उपशावरही निर्बंध आणण्याची गरज महसूल विभागाला आहे.

महिनाभरानंतर लाभार्थ्यांना पत्र
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी रेती मिळण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात तहसीलदारांकडे अर्ज केला होता. त्या अर्जावरून तहसीलदारांचे पत्र तब्बल महिनाभराने लाभार्थ्यांना मिळाले आहे. विशेष म्हणजे या पत्रात भंडारा तालुक्यात रेती लिलावाबाबत प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे आपणास रेती पुरविणे शक्य होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यात गोंधळाची स्थिती झाली आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून रेती पुरवठा करण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे तहसीलदारांचे पत्र तब्बल महिनाभराने मिळाल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे.

घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य दोन ब्रास रेती उपलब्ध करून देण्याबाबत चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळाले. संबंधितांनी तहसील कार्यालयात अर्ज करावा. अर्ज करणाºया लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या ८२ लाभार्थ्यांचे रेती मागणीचे अर्ज तहसीलला प्राप्त झाले आहेत.
-अक्षय पोयाम, तहसीलदार

घरकुल लाभार्थ्यांनी रेतीसाठी अर्ज करावे - आमदार चरण वाघमारे
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रेती घाटाची लिलाव प्रक्रिया व विक्री बंद आहे. त्यामुळे गरीब - गरजू लाभार्थ्यांना रेतीअभावी बांधकाम करणे कठीण झाले. यासाठी तुमसर-मोहाडीचे आमदार चरण वाघमारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यावरून शासनाने घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना विनामूल्य दोन ब्रास रेती देण्यास मान्यता दिली आहे. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत. आता लाभार्थ्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावे असे आवाहन आमदार चरण वाघमारे यांनी केले आहे.

Web Title: Free two brass sand for the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.