पनवेलमध्ये फ्री वाय-फायचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2017 02:28 AM2017-03-03T02:28:34+5:302017-03-03T02:28:34+5:30

महापालिकेची निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Free Wi-Fi Entrance at Panvel | पनवेलमध्ये फ्री वाय-फायचा जोर

पनवेलमध्ये फ्री वाय-फायचा जोर

Next

मयूर तांबडे,
पनवेल- महापालिकेची निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून प्रलोभने दाखवली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आल्या असून, यात सर्वच पक्ष आघाडीवर दिसत आहेत.
पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली व महाराष्ट्रातील २७वी महापालिका असून पालिकेच्या चाव्या आपल्या ताब्यात याव्यात, यासाठी सर्वच राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत.
प्रभाग रचना जाहीर झाली असून, आरक्षणानुसार पक्षांची शोधमोहीम सुरू असून इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचार सुरू केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा नागरिकांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्वी गृहोपयोगी वस्तू- साड्या वाटप, नळाची जोडणी, मलनि:सारण वाहिन्यांची सफाई आदी आश्वासने दिली जायची. मात्र, आता ही आश्वासने जुनी झाली आहेत. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून तरु ण पिढीची गरज लक्षात घेऊन वाय-फाय झोन, डेटा कार्ड ही नवीन आश्वासने दिली जात आहेत.
सध्या तरु ण पिढीतील मतदारांकडून मात्र सेल्फी पॉइंट, वाय-फाय फ्री झोनची मागणी केली जात आहे. इंटरनेट तसेच स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे.
पनवेल शहरात पहिल्यांदाच मनसेने राजगड या कार्यालयात वाय-फाय सेवा सुरू केली होती. मात्र, वर्षभरातच वाय-फाय सेवेला
ग्रहण लागले व सेवा बंद पडली. त्यानंतर श्रीकांत ठाकूर यांनी साईनगर येथे फ्री वाय-फाय सेवा सुरू केली. शेतकरी कामगार पक्षाचे संदीप पाटील यांनी नवीन पनवेलमध्ये एक-दीड महिन्यापूर्वी वाय-फाय सेवा सुरू
केली आहे. तर मनसेचे यतीन देशमुख यांनी मराठी दिनाचे औचित्य साधून नुकतीच फ्री वाय-फाय सेवा सुरू केली. खांदा कॉलनीतील मनसेचे इच्छुक उमेदवार अ‍ॅड. संतोष सरगर यांनीही मोफत वाय-फाय सेवा सुरू केली आहे. अन्य इच्छुक उमेदवारदेखील आपापल्या प्रभागात फ्री वाय-फाय सेवा देण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिनिधी)
>मोफत वाय-फाय सुविधेसाठी संबंधित इच्छुक उमेदवारांच्या नावाचा पासवर्ड असतो. त्यामुळे उमेदवाराचा नकळत प्रचारही होतो. सध्या मोबाइलचा वाढता वापर आणि शासनाचे आॅनलाइन सेवा धोरण, तसेच सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे फ्री वाय-फाय सेवा हा आकर्षक प्रचाराचा भाग बनला आहे.

Web Title: Free Wi-Fi Entrance at Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.