गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते मोहन रानडे कालवश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 10:05 AM2019-06-25T10:05:09+5:302019-06-25T10:07:25+5:30

वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

freedom fighter mohan ranade who participated in Goa liberation dies at the age of 90 | गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते मोहन रानडे कालवश

गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते मोहन रानडे कालवश

Next

पुणे: गोवा मुक्तिसंग्रामातील लढवय्ये कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांचे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. काही महिन्यांपासून त्यांना अन्न नलिकेच्या विकाराचा त्रास सुरू होता. तसेच त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबीनदेखील कमी झाले होते. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अत्यवस्थ होती. उपचारादारम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. 

मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते ही रानडे यांची महत्त्वाची ओळख आहे. रानडे यांना पोर्तुगालात 26 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गोव्याच्या मुक्तीनंतरही त्यांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला. १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. रानडे यांनी शिक्षकी पेशा स्वीकारून गोव्यात प्रवेश केला. पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. बेती येथील पोलिस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले आणि १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांची रवानगी पोर्तुगालमधील लिस्बन येथे झाली. १९६२ मध्ये केंद्र सरकारच्या लष्करी कारवाईनंतर ४५० वर्षांच्या पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून गोवा स्वतंत्र झाला. 

रानडे यांच्या सुटकेसाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत आवाज उठविला होता. संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांनी पोप पॉल यांची व्हॅटिकन सिटीत भेट घेऊन रानडे यांच्या सुटकेची मागणी केली होती. पोपनी हस्तक्षेप केल्यानंतर रानडे यांची सुटका झाली.
रानडे यांचे गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र तसेच ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा सरकारने ‘गोवा पुरस्कार’ तसेच केंद्र सरकारने पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.
 

Web Title: freedom fighter mohan ranade who participated in Goa liberation dies at the age of 90

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.