रस्त्याची खड्ड्यांपासून मुक्तता
By admin | Published: October 18, 2016 01:17 AM2016-10-18T01:17:54+5:302016-10-18T01:17:54+5:30
भोर एसटी स्टँड ते रामबाग रोडवर बऱ्याच दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता़
नेरे : भोर एसटी स्टँड ते रामबाग रोडवर बऱ्याच दिवसांपासून खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता़ नागरिकांना व प्रवाशांना प्रवास करताना होणारा त्रासाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित खात्याला जाग येण्यासाठी ‘लोकमत’ने सोमवारी (दि.१०) ‘भोर एसटी स्टँड रस्ता गेला खड्ड्यांत’ ही बातमी प्रसिद्ध केली होती़ या बातमीचा परिणाम होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे़
भोलावडे नवीन पूल ते रामबाग रोड रस्त्याची मोठ-मोठे खड्डे पडून प्रचंड दुरवस्था झाली होती़ त्यामुळे अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या होत्या़ याच रोडवर चार दिवसांपूर्वी सकाळी भाबळीचे झाड पडले होते़ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावरील झाड न काढल्याने एका तरुणास आपला जीव गमवावा लागला, तर एक गंभीर जखमी आहे़
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे़ खोदून ठेवलेले रस्ते, पुलांना संरक्षक कठडे नाहीत, रस्त्याच्या साईडपट्ट्या व सूचनाफलक झाडा-झुडपांनी झाकले आहेत. गटारे साफ केलेली नाहीत. असा कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाचा सुरू आहे.
भोर एसटी स्टँड ते रामबाग रोडवरील बांधकाम विभागाकडून खड्डे भरण्याचे काम चालू असल्याने नागरिक व प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात असले, तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा मात्र जनतेकडून निषेध करण्यात येत आहे.
(वार्ताहर)
>शाखा अभियंत्याचा तपास पोलिसांकडून धीम्यागतीने
भोर एसटी स्टँड ते रामबाग रस्त्यावर चार दिवसांपूर्वी झालेल्या गंभीर अपघाताला जबाबदार असणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्यावर भोर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. त्याचा तपास पोलीस यंत्रणेकडून धीम्यागतीने सुरू असल्याने भोर पोलिसांचाही भोंगळ कारभार उघडकीस येत आहे.