उन्माद ओसरला, उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 01:48 AM2016-08-26T01:48:36+5:302016-08-26T01:48:36+5:30

गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालय, पोलीस आणि नियम यांभोवती फिरणारी गोपाळकालाची हंडी अखेर गुरुवारी मोठ्या उत्साहात बालगोपाळांनी फोडली.

Frenzy disappeared, enthusiasm persisted | उन्माद ओसरला, उत्साह कायम

उन्माद ओसरला, उत्साह कायम

Next


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालय, पोलीस आणि नियम यांभोवती फिरणारी गोपाळकालाची हंडी अखेर गुरुवारी मोठ्या उत्साहात बालगोपाळांनी फोडली. काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न बहुतेक गोविंदा पथके आणि आयोजकांनी केला. या सर्व प्रकारात जमेची बाजू म्हणजे गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीआड सुरू असलेल्या धिंगाण्यालाही कुठेतरी आळा बसल्याचे दिसले.
ऐन दोन दिवसांआधी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम राखल्याने दहीहंडीच्या उत्सवावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र मुंबई शहरासह उपनगरांत विविध राजकीय पक्षांनी मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला. उत्सवातील उत्साह दाखवणाऱ्या गिरणगावातील काळाचौकी, लालबाग, भायखळा, वरळी, प्रभादेवी आणि शिवडी परिसरांत छोट्या आयोजकांनी मोठ्या संख्येने हंड्यांचे आयोजन केले होते. किमान चार थरांपासून कमाल पाच थरांपर्यंतच्या या हंड्या होत्या. जखमी गोविंदांसाठी बहुतेक आयोजनाच्या ठिकाणी रुग्णवाहिकेसह डॉक्टरांची व्यवस्था केल्याचे दिसले. मात्र गोविंदासाठी हेल्मेट आणि सेफ्टी बेल्टची व्यवस्था फारच कमी आयोजकांनी केली होती. त्यामुळे हंडीची उंची आणि गोविंदाचे वय या महत्त्वाच्या नियमांची पूर्तता करणाऱ्या आयोजकांकडून किरकोळ नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसले.
राजकीय पक्ष आणि संस्थांनीआयोजित केलेल्या हंड्या गोविंदांनी गाण्यांवर थिरकत फोडल्या. सर्वोच्च न्यायालयाचे २० फुटांचे निर्देश याठिकाणी धाब्यावर बसविण्यात आले असले तरी हंडी फोडताना गोविंदा जखमी होऊ नये म्हणून सुरक्षेची काळजी घेण्यात आली. उत्साह सायंकाळीउशिरापर्यंत तसूभरही कमी झाला नव्हता. एकंदर मागील दीड ते दोन महिन्यांपासून गोविंदा पथकांचा सुरूझालेला सराव हंडीदिवशी सत्कारणी लागल्याचे चित्र होते. सकाळपासूनच कुर्ला-सीएसटी रोड, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, घाटकोपर-असल्फा रोड हे रस्ते गोविंदा पथकांनी भरून वाहात होते.
>कारवाईमुळे गोविदांमध्ये पोलिसांचा धाक
उत्सवाला गालबोट लावणाऱ्या गोविंदांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला होता. दुचाकीवर ट्रिपलसीट जाणाऱ्या चालकांसह विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या गोविंदांवर पोलिसांनी कारवाई केली. शिवाजी पार्क पोलिसांनी तर ट्रकच्या टपावर बसणाऱ्या गोविंदा पथकांवरही कारवाई केली. त्यामुळे टिंगलटवाळी करणाऱ्या गोविंदांनीही पोलिसांचा चांगलाच धाक घेतला होता.
>पोलिसांच्या
शूटिंगची बोंब
बहुतांश ठिकाणी २० फुटांहून अधिक उंच थर रचणाऱ्या गोविंदा पथकांचे चित्रीकरणच पोलिसांनी केले नाही. कॅमेरा नसल्याने आणि मनुष्यबळाअभावी चित्रीकरण करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तर काही ठिकाणी पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदा पथकांची नावे लिहून घेतली जात होती. प्रभादेवीतील एका ठिकाणी २० फुटांहून उंचहंडी लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोविंदांना रोखण्याचे काम पोलीस करीत होते.
>काळे झेंडे फडकले!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवडी विधानसभेतर्फे परळ गाव येथे आयोजित केलेल्या उत्सवात अ‍ॅन्टॉप हिल येथील साईकृपा मित्र मंडळाच्या गोविंदा पथकाने पाचव्या थरावर काळा झेंडा फडकावून निषेध व्यक्त केला.
या पथकाला पारितोषिकाच्या ठरलेल्या रकमेहून अधिक रक्कम देत मनसेचे उपविभागाध्यक्ष संतोष नलावडे यांनी न्यायालया विरोधातील रोष व्यक्त केला.
>प्रभादेवीतील श्री हनुमान मित्र मंडळ पथकातील चौथ्या थरावरील गोविंदाने काळा रूमाल दाखवून सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाविरोधात निषेध नोंदविला.
प्रभादेवीच्या सौरभ मित्र मंडळाने एकमेकांच्याखांद्यावरबसून सात थर लावत निर्बंधाविरोधात नाराजी व्यक्त केली.
पठाणवाडीतील शहीद अब्दुल हमीद चौक येथे अ‍ॅड. ज्ञानमूर्ती शर्मा यांनी काळ्या हंडीचे आयोजन केले होते.
इस्कॉनमध्ये
श्रीकृष्ण जन्मोत्सव
गिरगाव आणि जुहू येथील इस्कॉन मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्णजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी, मंदिरातील राधा-कृष्णाच्या मूर्तींना विविध अलंकारांनी सजविण्यात आले होते.
>रणबीर कपूरने फोडली फुटबॉलची हंडी
मुंबई सिटी फुटबॉल क्लबच्या दहीहंडी उत्सवात युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने हजेरी लावली होती. फुटबॉलच्या रंगात असलेली दहीहंडी अभिनेता रणबीर कपूरने फोडली.
>महिला गोविंदांचा
फिरत्या थरांचा मनोरा
दादर येथे प्रसिद्ध दहीहंडी उत्सवाच्या आयोजनात एका महिला गोविंदा पथकाने फिरत्या थरांचे मानवी मनोरे रचले. हा थरार पाहताना उपस्थितांनीही या पथकाला उत्स्फूर्त प्रोत्साहन देत कौतुक केले. एक्क्याच्या बालगोविंदाला पूर्ण सुरक्षेचे कवच देत या पथकाने चार थरांची सलामी दिली.
>सामाजिक संदेश देणारी गिरकी
मालाड येथील आद्यशक्ती श्री भवानी शक्तिपीठ या आयोजकांनी नियमांचे पालन करत उत्सवाचे आयोजन केले होते. शिवाय नशामुक्तीचा संदेश देणारे चलचित्र सादर करत गोविंदामध्ये जनजागृती केली. दहिसर येथील स्वराज्य गोविंदा पथकाने चार थर लावल्यानंतर गोल फेरी घेतली.
>सामाजिक प्रश्नांवर भाष्य
जोगेश्वरीच्या शिव शंभो गोविंदा पथकाने पाच थर रचतानाच बलात्कार, रस्त्यामधील खड्डे अशा सामाजिक विषयांवर भाष्य करणारे बॅनर फडकावत उपस्थितांचे लक्ष वेधले. चहूबाजूकडील प्रेक्षकांपर्यंत संदेश पोहोचावा म्हणून पथकाने थर रचल्यानंतर मनोऱ्यासह गिरकी घेतली.
>कोळी बांधवांनी भाल्याने फोडली हंडी
वेसावे कोळीवाड्यातील दहीहंडीचा मान यंदा ९ वर्षांनी वेसावा कोळी जमात रिलीजियस अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टला मिळाला. ट्रस्टचे अध्यक्ष मनीष भुनगवले यांनी हंडी फोडली. मुंबई आणि राज्यात सर्वत्र मनोरे रचून हंडी फोडण्याची परंपरा असली, तरी वेसावे कोळीवाड्यात भाल्याने हंडी फोडण्याची निराळी परंपरा आहे. येथील राम मंदिर परिसरात अणुकुचीदार भाल्याने हंडी फोडण्यात आली.

Web Title: Frenzy disappeared, enthusiasm persisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.