वीजपुरवठा होतोय वारंवार खंडित
By admin | Published: March 1, 2017 01:32 AM2017-03-01T01:32:30+5:302017-03-01T01:32:30+5:30
धानोरी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.
विश्रांतवाडी : धानोरी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्याने आणि उन्हाळ्यापूर्वीच वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याबाबत नागरिकांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अद्याप उन्हाळा सुरू व्हायचा आहे, तर ही परिस्थिती आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या तर बारावीची बोर्ड परीक्षा सुरू आहे, अशात वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. रात्री-अपरात्री अथवा दिवसाही वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत नागरिकांनी महावितरणकडे चौकशी केल्यानंतर प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितली जातात, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते. धानोरी परिसराची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. या परिसरात स्थानिक नागरिकांबरोबरच आयटी, बँक व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कर्मचारी, बाहेर राज्यांतून आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. याबाबत महावितरणचे धानोरी शाखेच्या कनिष्ठ अभियंत्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी दूरध्वनी घेतला नाही. तर विश्रांतवाडी केंद्राच्या प्रमुखांनीही असमर्थता दर्शवली.
(वार्ताहर)
>परीक्षाकाळात वीजपुरवठा सुरळीत राहावा
या परिसरात अनेक रुग्णालये व शाळाही आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने या सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागतो. बारावी परीक्षेच्या काळात तरी वीजपुरवठा सुरळीत राहावा, एवढीच नागरिकांची माफक अपेक्षा आहे.