रिक्षाचालकांचा ३१ आॅगस्टला संप
By admin | Published: August 6, 2016 05:08 AM2016-08-06T05:08:15+5:302016-08-06T05:08:15+5:30
ओला व उबर यांसारख्या अॅग्रीगेटर्सवर तत्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने संपाचा इशारा दिला
मुंबई : मुंबईतील अवैध वाहतुकीसह ओला व उबर यांसारख्या अॅग्रीगेटर्सवर तत्काळ बंदी आणावी, या मागणीसाठी ३१ आॅगस्टला मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने संपाचा इशारा दिला आहे. युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली.
राव म्हणाले की, अवैध वाहतुकीचे पुरावे देत युनियनने १५ फेब्रुवारी, २०१६ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे दिले होते. मात्र त्यानंतरही शासनाने युनियनची एकही मागणी पूर्ण केलेली नाही. शिवाय मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाहीसुद्धा झालेली नाही.
उपनगरांत टाटा सुमो, तवेरा, इंडिका आणि खासगी बसेसमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे धंदा करणाऱ्या आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याने उपनगरांत अवैध वाहतूक फोफावली आहे. याशिवाय पूर्व आणि पश्चिम उपनगरांत हजारो रिक्षाचालक विनाबॅज रिक्षा चालवत आहेत. ज्या चालकांनी तीन वर्षांहून अधिक काळ रिक्षा चालवण्याचा परवाना मिळवला आहे, त्यांना विनाविलंब बॅज देण्यात यावा. त्यामुळे प्रामाणिक रिक्षाचालकांना सन्मानाने धंदा करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
ओला, उबर या अॅग्रीग्रेटर्ससाठी कायदे व नियम तयार करण्यात राज्य सरकार दिरंगाई करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राव म्हणाले की, १७ जून, २०१५ रोजी युनियनने केलेल्या आंदोलनानंतर सरकारने प्रारुप नियम (ड्राफ्ट रूल्स) तयार करत, त्यांवर ३१ आॅक्टोबर २०१५पूर्वी हरकती व सूचना मागविल्या होत्या. १० महिने उलटूनही अग्रीग्रेटर्ससाठी नियम अथवा कायदे लागू करण्यात आलेले नाहीत. एकीकडे रिक्षाचालकांवर कारवाई करायची, तरी दुसरीकडे कोणत्याही नियमाशिवाय रस्त्यावर वावरणाऱ्या अॅग्रीग्रेटर्सना अभय द्यायचे, हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप राव यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
>८ आॅगस्टपासून ‘स्वाक्षरी मोहीम’!
मुंबई पश्चिम आणि पूर्व उपनगरांत ८ आॅगस्टपासून स्वाक्षरी मोहीम घेण्याची घोषणा युनियनने केली आहे. हजारो रिक्षाचालकांच्या स्वाक्षऱ्या ३१ आॅगस्टपर्यंत जमा केल्या जातील. त्यानंतर ३१ आॅगस्टला रिक्षा बंद ठेवून हजारो रिक्षाचालक आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील. या वेळी हजारो स्वाक्षऱ्यांसह मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना सादर केले जाईल.
>रिक्षा चालक-मालकांच्या प्रमुख मागण्या -
अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर निर्बंध आणावेत.
तीन वर्षांपेक्षा अधिक काळ आॅटोरिक्षाचा परवाना असलेल्या चालकांना बॅज देण्यात यावे.
ओला, उबरसारख्या अग्रीग्रेटर्सवर तत्काळ बंदी घालावी.
आॅटोरिक्षा चालक व मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी.
मुंबईच्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी आॅटोरिक्षाच्या एक लाख नवीन परवान्यांचे वितरण करावे.