यारों का यार

By admin | Published: May 27, 2017 06:17 AM2017-05-27T06:17:09+5:302017-05-27T06:17:09+5:30

साधारणत: राजकीय क्षेत्रात उंची गाठल्यानंतर, बालमित्र, सवंगडी यांच्यासाठी नेत्यांना वेळ राहत नाही. अनेकदा तर नेतेमंडळी जवळच्या मित्रांनाही ओळख दाखवत नाही.

Friend of man | यारों का यार

यारों का यार

Next

साधारणत: राजकीय क्षेत्रात उंची गाठल्यानंतर, बालमित्र, सवंगडी यांच्यासाठी नेत्यांना वेळ राहत नाही. अनेकदा तर नेतेमंडळी जवळच्या मित्रांनाही ओळख दाखवत नाही. मात्र, विरोधी पक्षातही मित्र बनविणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी हे मात्र याला अपवाद आहेत. राजकीय शिखर गाठल्यावर नवीन मित्र बनवत असताना, जुन्या मित्रांसोबत जिव्हाळा कायम आहे. ते मित्रांसाठी व्यस्त वेळापत्रकातूनदेखील आवर्जून वेळ काढतात आणि त्यांच्या अडीअडचणींना अगदी धावून जातात. म्हणूनच गडकरी यांना ‘यारों का यार’ असेच संबोधले जाते.

मला घडविले - नागो गाणार
विधान परिषदेचे आमदार नागो गाणार हे नितीन गडकरी यांचे महाविद्यालयीन जीवनातील मित्र. नागपुरातील मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात आम्ही ‘बीएसस्सी’च्या पहिल्या वर्षी एकत्रच होतो. त्यानंतर, नितीनजी यांनी ‘बीकॉम’ला प्रवेश घेतला. आम्ही दोघेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होतो. नितीन गडकरी यांची संघटनात्मक मानसिकता अगोदरपासून पक्की होती. विशेष म्हणजे, ते चांगले कार्यकर्ता बरोबर हेरायचे व त्यांना समोर न्यायचे. मलादेखील राजकारणात त्यांनीच आणले. त्या काळी विद्यार्थी परिषदेकडून निवडणूक लढणे म्हणजे पराभव अटळ असेच चित्र असायचे. मात्र, नितीनजींनी स्वत: उभे न राहता, मला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे केले. त्यांच्या संघटनात्मक बांधणी कौशल्यामुळे मी चक्क जिंकून आलो. महाविद्यालयाचा ‘सीआर’ व पुढे विद्यार्थी संघाचा अध्यक्ष म्हणूनदेखील निवडून आलो. पुढे राजकारणात नितीनजींनी मोठे टप्पे गाठले. मात्र, ते जुन्या मित्रांना विसरले नाहीत. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकांत त्यांनी मला आग्रहाने उभे केले. त्यांच्या मार्गदर्शनातून मला दोनदा विजय मिळाला.

अष्टपैलू - - नियंत पाठक, बालमित्र
डी.डी.नगर महाविद्यालयात शिकत असताना, आमच्या शाळेत दोन ते तीन मुले अतिशय गरीब होती. बाहेरगावच्या एका विद्यार्थ्याची स्थिती तर फारच खराब होती. त्या काळात नितीनजींनी त्याला घरी ठेवून घेतले. त्याचे शिक्षण केले. ही सामाजिक जाणीव त्यांनी आयुष्यभर जपल्याचे आम्ही अनुभवले. नितीन वक्तृत्वात नेहमीच आघाडीवर असायचे व अनेक आंतरशालेय स्पर्धा त्यांनी गाजवल्या. त्यांना नाटकांची आवड होती. ‘संगीत सौभद्र’ नाटकात त्यांनी काम केले होते. क्रिकेट खेळण्यासाठी तर ते कधीही तयारच असायचे. शाळेच्या क्रिकेटच्या टीममध्ये ते होते. आज ते देशाचे नेते असले, तरी आमच्यासाठी ते मित्रच आहेत. त्यांनीदेखील हे संबंध जपलेले आहेत व यातच त्यांचे मोठेपण.

विदर्भाच्या विकासात मोठे योगदान - मधुकर (मामा) किंमतकर
गडकरी आणि मी विधान परिषदेत सोबत होतो. अनेक वर्षे सोबत काम केले आहे. विदर्भावरील अन्यायाच्या विरोधात ते सातत्याने लढले. विदर्भाच्या विकासासाठी ते सातत्याने काम करीत राहिले. आजही करीत आहेत. विदर्भाच्या विकासासाठी त्यांचे योगदान फार मोठे आहे. ते आपल्या जीवनात असेच उत्तरोत्तर मोठे होत राहोत.

माझ्या जीवनाचे शिल्पकार - चंद्रशेखर बावनकुळे
काही कार्यकर्त्यांसोबत आंदोलन करीत असताना, गडकरी साहेबांनी मला बघितले. आमची समस्या समजून घेतली. भेटायला ये, असा निरोपही दिला. राजकारणातील माणसे अशी औपचारिकपणे बोलत असतात आणि नंतर विसरून जातात. त्यामुळे मलाही तसेच वाटले आणि मी विसरूनही गेलो, पण एक दिवस गडकरी साहेबांनी निरोप देऊन मला वाड्यावर बोलावले. भाजपासाठी काम करशील का, असे त्यांनी मला विचारल्यावर मला काहीच समजत नव्हते. पुढे जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली, प्रचाराला आले. त्या वेळी धरलेले माझे बोट त्यांनी नंतर कधी सुटू दिले नाही. माझ्या राजकीय जीवनात गडकरींचे स्थान फार वेगळे आहे. राजकारण व प्रशासनातील स्थानाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या माणासासाठीच झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो.


भव्य विकास प्रकल्प साकारणारा नेता अशी नितीन गडकरींची ओळख आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा त्यांनी साकारलेला पहिला मोठा प्रकल्प आहे. त्याच काळात त्यांनी मुंबईत ५६ उड्डाणपूल बांधले. गडकरी कधीच कार्यकर्त्यांना विसरत नाहीत. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री असताना, त्यांनी नव्याने अभियंता झालेल्यांना कंत्राटे दिली. सरकारी व्यवस्थेत असे कधी घडले नव्हते, पण गडकरींनी त्या तरुणांवर विश्वास टाकला व तो सार्थ ठरला. असे अनेक धाडसी प्रयोग गडकरींनी केले. त्यांनी ऐकीव माहितीवर विश्वास ठेवला नाही. देशहिताकरिता आणखी माठे स्वप्न पाहण्यासाठी व ते पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

- चंद्रकांत पाटील, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री, महाराष्ट्र


मी पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा २००४ साली नितीन
गडकरी हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. तिथे त्यांची आणि माझी पहिल्यांदा ओळख झाली. मी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच असल्याने सरकारविरोधी व्यूहरचनेत त्यांनी मला सहभागी करून घेतले. त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे. सर्व पक्षांत त्यांचे मित्र आहेत.
- खा. राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Web Title: Friend of man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.