उद्योगांना जलदगतीने परवानगी देणारा मैत्री कायदा विधानसभेत संमत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 05:58 AM2023-03-04T05:58:36+5:302023-03-04T05:58:54+5:30
विरोधकांनी या विधेयकावर चर्चा करताना सरकारवर टीका केली. हे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात असून आता ते या नव्या कायद्यामुळे लवकर गुजरातला जातील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात येणाऱ्या उद्योगांना जलदगतीने आणि सुलभरित्या परवानगी मिळाव्यात यासाठी उपयुक्त ठरणारा ‘मैत्री कायदा’ शुक्रवारी विधानसभेत संमत करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भातील महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक २०२३ विधानसभेत मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या कायद्यामुळे महसूल, पर्यावरण, प्रदूषण, उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व परवानगी तत्काळ मिळणार आहेत.
विरोधकांनी या विधेयकावर चर्चा करताना सरकारवर टीका केली. हे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग गुजरातला जात असून आता ते या नव्या कायद्यामुळे लवकर गुजरातला जातील, असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी काढला. त्यावर गुजरातला प्रकल्प गेल्याची टीका होते, मात्र आम्ही महाराष्ट्रात प्रकल्प कसे आणले याबद्दल कुणी बोलत नाही, असे उत्तर मंत्री सामंत यांनी विरोधकांना दिले.
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी २८ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. आरबीआयने यासंदर्भातील अहवाल सादर केला आहे. मैत्री कायदा उद्योग आणि परकीय गुंतवणुकीसाठी फायद्याचा आहे, असे सामंत यांनी सांगितले.