मोदी-शाह, शाहरुख-सलमान ते अंबानी... देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला मान्यवरांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:25 IST2024-12-05T16:25:01+5:302024-12-05T16:25:30+5:30
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत.

मोदी-शाह, शाहरुख-सलमान ते अंबानी... देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला मान्यवरांची उपस्थिती
Devendra Fadnavis Oath Taking : भाजप नेते देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात महाराष्ट्राच्यामुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांसह अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. राजकीय क्षेत्राव्यतिरिक्त उद्योग, चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित असतील. यामध्ये नीता अंबानी, सलमान खान अन् शाहरुख खानचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी 5.30 वाजता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्रीही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला हजारो लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांसह किमान 10 केंद्रीय मंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध व्यक्ती
शपथविधी सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि राधिका अंबानी यांच्याशिवाय अनंत अंबानी, प्रणय अदानी हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. अंबानी कुटुंबाव्यतिरिक्त नोएल टाटा, दीपक पारिख, कुमार मंगलम बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, गीतांजली किर्लोस्कर, मानसी किर्लोस्कर हे देखील या कार्यक्रमाचा भाग असतील.
बॉलिवूडमधून अनेकांची हजेरी
या शपथविधी सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहरेही उपस्थित राहणार आहेत. शाहरुख खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, विकी कौशल, खुशी कपूर, रूपा गांगुली, सिद्धार्थ रॉय, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे देखील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, बोनी कपूर आणि एकता कपूर यांच्यासह श्रद्धा कपूर, जय कोटेक, विक्रांत मॅसी आणि जयेश शाह यांचाही समावेश असेल. भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरसह या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी चार हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.